शिवसेनेचे आंदोलन; महापौरांची पंचाईत
करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत, अभ्यासाच्या नावाखाली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या सततच्या सहलींच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या महापालिका सभेत गदारोळ झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी टोप्या घालून महापौरांच्या आसनापुढेच आंदोलन केले. या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी आणि सेना नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली. दौऱ्यातून काय अभ्यास झाला, याची माहिती सभेला देण्याचे आव्हान महापौरांना देण्यात आले, तेव्हा उत्तर देताना महापौरांची चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र दिसून आले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या सभेत, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत नव्याने निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक राम पात्रे यांचा सभेत सत्कार करण्यात आला. नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांची पहिलीच सभा असल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे, ३१ मे ला निवृत्त होत असलेल्या शहर अभियंता महावीर कांबळे, क्षेत्रीय अधिकारी दत्तात्रय फुंदे, दिलीप सोनवणे यांना सभेत निरोप देण्यात आला. शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. महापौरांसह सत्ताधारी नगरसेवकांचा नुकताच झालेला सिक्कीम दौरा तसेच यापूर्वी झालेल्या विविध ‘अभ्यास’ दौऱ्यांचा संदर्भ देत त्याची माहिती सभेपुढे ठेवावी, अशी मागणी शिवसेनेने केली. उबाळे यांनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण त्यांनी तीव्र आक्षेप घेतला, यावरून दोहोंत वादावादी झाली. तेव्हा सभेत गोंधळाचे वातावरण झाले. नागरिकांच्या पैशाच्या जोरावर दौरे करता, त्यातून शहराचा काय फायदा झाला, याचा खुलासा करण्याची मागणी महापौरांकडे करण्यात आली. तेव्हा उत्तर देताना महापौर गडबडल्या. त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही.

‘तुम्हाला ऐकून घेण्याची शक्ती मिळो’
नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सभेपुढे स्वत:चा परिचय करून दिल्यानंतर, स्वागतपर भाषणांची चढाओढ सुरू झाली. चुकीच्या कामांना थारा देऊ नका, कोणाच्या दबावाला बळी पडू नका, असे सीमा सावळे म्हणाल्या. तर, आयुक्तांना सभेत सर्वकाही ‘ऐकून’ घ्यावे लागते. त्यामुळे ऐकून घेण्याची ती शक्ती तुम्हाला मिळो, अशी टिप्पणी रिपाइंच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी केली. शहरात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, जागोजागी टपऱ्यांचा व पथारीवाल्यांचा सुळसुळाट झाला असून त्यावर अंकुश ठेवण्याची मागणी योगेश बहल यांनी केली.