महाविद्यालयीन प्रवेश, शाळाप्रवेश आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे विविध दाखले मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या कोथरूड विभागातर्फे शासन आपल्या दारी उपक्रम राबवला जाणार असून या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.
शाळांमधील प्रवेशासाठी तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी सध्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता भासते आहे. त्या बरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठीही नागरिकांना अर्जाबरोबर दाखले जोडावे लागतात. अनेकदा दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ होते. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक योगेश मोकाटे यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. या उपक्रमात प्रामुख्याने उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, रहिवासी प्रमाणपत्र दिले जाणार असून ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नवीन आधार कार्ड, आधार कार्डाची दुरुस्ती, आधार कार्ड मतदान कार्डला जोडणे ही कामेही केली जाणार आहेत.
पहिल्याच दिवशी या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. महा ई सेवा केंद्राचे चंद्रकांत कुंबरे आणि रोहित मोकाटे यावेळी उपस्थित होते. विभाग प्रमुख नंदू घाटे, तसेच अनिल घोलप, बाळा टेमकर, शिवाजी गाढवे, किरण साळी, अक्षय उभे आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले आहे. कोथरूडमधील संभाजी विद्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून तो सोमवार (१५ जून) पर्यंत चालणार आहे.