खासदार बारणे यांची माहिती

पर्यटकांचा आकर्षणिबदू असलेली ‘माथेरानची राणी’ ही मिनी ट्रेन बंद न करता पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन एकाच आठवडय़ात दोन वेळा रुळावरून घसरल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला, यावरून पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. या पाश्र्वभूमीवर, ही सेवा पूर्ववत चालू ठेवण्यासंदर्भात बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली आहे. सुरेश प्रभू यांची त्यांनी शिष्टमंडळासमवेत समक्ष भेट घेतली. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या माथेरान या पर्यटनस्थळी ब्रिटिश काळापासून असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची रेल्वे सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा आहे. ही सेवा पूर्ववत चालू ठेवण्याची गरज आहे, असे बारणे यांनी प्रभू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी बारणे यांच्यासमवेत चंद्रकांत चौधरी, प्रसाद सावंत, कैलास चौधरी आदी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून या रेल्वेसेवेला ग्रहण लागले आहे. एकाच आठवडय़ात दोन वेळा ही रेल्वे रुळावरून घसरली होती. त्यामुळे ही सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याची आपली माहिती आहे.

देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी येतात. मुंबईच्या लोकल सेवेप्रमाणेच ही रेल्वेसेवा माथेरानकरांच्या उदरनिर्वाहाची ‘लाइफलाइन’ बनलेली आहे. येथील पर्यटनाला कशाप्रकारे चालना मिळेल, या दृष्टिकोनातून सरकारने याकडे पाहावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी प्रभू यांच्याकडे केली आहे.