पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्याचे काम करा, बंडखोरीचा विचार असल्यास आताच सांगा. महायुतीचा विजय निश्चित आहे. मात्र, कोणीही गहाळ राहू नका, अशी तंबी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील इच्छुकांना दिली. भोसरीसाठी चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे आणि चिंचवडसाठी मुलाखत दिलेले माजी नगरसेवक नाना काटे यांच्या संभाव्य अतिक्रमणामुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र सेनेत आहे.
शहरातील तीनपैकी दोन जागा सेनेकडे आहेत. त्यातील भोसरीसाठी गटनेत्या सुलभा उबाळे, शहरप्रमुख विजय फुगे, नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक किसन तापकीर, नंदू दाभाडे, शैलेश मोरे यांच्या तर, चिंचवडसाठी उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, शहरप्रमुख राहुल कलाटे, दिलीप आंब्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे आणि ‘कागदोपत्री’ काँग्रेसशी संलग्न असलेले अपक्ष नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या मुलाखती झाल्या. उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, अनिल देसाई, रामदास कदम यांनी त्या घेतल्या. नगरसेवक नीलेश बारणे उशिरा पोहोचले. पक्षादेश पाळण्याचे आदेश ठाकरे यांनी सर्वाना दिले. ज्यांना उमेदवारी मिळू शकणार नाही, त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची ग्वाही त्यांनी दिली. शिवसेनेच्या संपर्कात असलेले काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महेश लांडगे यांनी मुलाखत दिली नाही. त्यांच्याविषयी चर्चा व प्रत्यक्षातील रहस्यमय पावित्र्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. चिंचवडसाठी युवा नेते नाना काटेंचे नाव अचानक पुढे आले. पाठोपाठ, त्यांनी मुलाखतही दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.