राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने शहराचा विकास खुंटविला आहे. त्यामुळे विकास करू न शकणाऱ्या कारभाऱ्यांना बदला, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. शिवसेना स्वबळावर महापालिकेत सत्ता काबीज करेल, असेही सेनेकडून स्पष्ट करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात येत्या २५ ऑक्टोबर रोजी शिवसेनेकडून परिवर्तन मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘आता बदला कारभारी सारे, पुण्यात आहे परिवर्तनाचे वारे’ असा नारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी निवडणुकीसाठीची पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.

शहर संघटक शाम देशपांडे या वेळी उपस्थित होते.

निम्हण म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह केंद्र आणि राज्यातील भाजपही शहराच्या विकासात अडथळे आणत आहे. भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसला साथ राहिली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसह अनेक प्रकल्पही रखडले आहेत.

त्यामुळे  कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. महापालिका निवडणुकीत नागरिकांपुढे सेनेच्या माध्यमातून सक्षम पर्याय असल्यामुळे सेनेची स्वबळावर सत्ता येईल, असे निम्हण यांनी सांगितले.

युतीचा निर्णय चर्चेनंतर-बापट

निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करायची की नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार आहे. सध्या प्राथमिक स्वरुपातही त्याची चर्चा सुरु झालेली नाही. भाजपमध्येही त्याबाबत संमिश्र मतप्रवाह आहे. पण आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री गिरिश बापट यांनी सांगितले. अन्य घटक पक्षांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेता येईल. शिवसेनेला युती करावीशी वाटत नसेल तर हरकत नाही, पण अद्यापही त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.