एक्स्प्रेस वेवरील अपघातांची मालिका अद्यापही सुरुच आहेत. रविवारी पहाटे दादरहून पुण्याला निघालेल्या शिवनेरी बसला तळेगाव टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात बसचालक सुनील गव्हाणे यांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी रात्री एसटी महामंडळाची शिवनेरी बस दादरहून पुण्याला निघाली होती. पावणे तीनच्या सुमारास बस तळेगाव टोलनाक्याजवळ आली असता बसचा अपघात झाला. शिवनेरी बसने मागून एका कंटेनरना धडक दिली. या धडकेत शिवनेरीचे चालक गव्हाणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जखमी प्रवाशांना उपचार करुन घरीदेखील सोडण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिका-यांनी दिली. अपघाताचे वृत्त समजताच पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.
मुंबई – पुणे प्रवास अधिक वेगाने व्हावा यासाठी एक्स्प्रेस वेची तयार करण्यात आला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. एक्स्प्रेस वेवरील वाढते अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. महामार्गावर लेनची शिस्त मोडणा-या, चुकीच्या पद्घतीने ओव्हरटेक करणा-या आणि अतिवेगाने गाडी पळवणा-या वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी महामार्गावर ड्रोन कॅमे-याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. शनिवारी या ड्रोन कॅमे-यांची तपासणी करण्यात आली. सध्या चार ठिकाणी ड्रोन कॅमे-यांद्वारे नजर ठेवली जाईल अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.