यावर्षीपासूनच ‘नीट’ लागू करण्याच्या निर्णयानंतर ‘नीट’ ची पुस्तके तयार करणाऱ्या प्रकाशकांना आणि विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. ‘नीट’च्या तयारीसाठी पुस्तके आणि गाईड्स घेण्यासाठी गुरूवारपासूनच विद्यार्थ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. विक्रीत दोन दिवसांत चाळीस टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा तुडवडा असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
वैद्यकीय अभ्यसक्रमांच्या परीक्षेसाठी ‘नीट’ होणार की ‘सीईटी’ या बाबत संभ्रम असला तरी अनेक विद्यार्थ्यांनी आता कंबर कसून तयारी सुरू केली आहे. या परीक्षांची पुस्तके घेण्यासाठी पुस्तक बाजारात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. परीक्षा जाहीर झाल्यानंतर गुरूवार सायंकाळपासूनच विद्यार्थ्यांनी पुस्तके घेण्यासाठी पुस्तक विक्रे त्यांकडे धाव घेतली. सध्या १० ते १५ प्रकाशनांची पुस्तके आणि प्रश्नसंच बाजारात उपलब्ध आहेत. स्थानिक प्रकाशकांबरोबरच दिल्लीतील अनेक प्रकाशनांच्या पुस्तकांनाही मागणी आहे. प्रश्नसंचांना अधिक मागणी आहे. अवघ्या एका दिवसांत पुस्तकांची विक्री ४० टक्क्य़ांनी वाढली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
विक्रेत्यांना दिलासा
विविध परीक्षांच्या तयारीची पुस्तके आणि गाईड शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच बाजारात येत असतात. या वर्षीच्या परीक्षेसाठीची पुस्तके बाजारात आली होती. मात्र, त्यानंतर ‘सीईटी’ लागू केल्यामुळे या पुस्तकांची मागणी कमी झाली. वर्षभर या पुस्तकांची विक्री कमी झाली होती. मात्र ‘नीट’ जाहीर झाल्यामुळे आता असलेल्या पुस्तकांचा खप होऊ लागला आहे, असे प्रगती बुक डेपोमधील विक्रेते महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा तुडवडा
‘एनसीईआरटी’ची पुस्तके मात्र मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. ‘नीट’साठी ‘एनसीईआरटी’चा अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. अजून नवी पुस्तके आलेली नाहीत आणि गेल्यावर्षीची पुस्तके पुरेशा प्रमाणात नाहीत. विद्यार्थ्यांची मागणी अचानक वाढल्यामुळे या पुस्तकांचा तुडवडा जाणवत आहे.