अजून आठवते..  श्रीकांत शिरोळे

श्रीकांत शिरोळे यांनी महापालिकेमध्ये दोन वेळा नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
bombay hc decision on petition filed by congress mla ravindra dhangekar over Development works in Kasba Constituency pune news
उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कसब्याच्या वाट्याला ‘भोपळा’च?
victory of the United Alliance of Leftist Student Unions in the JNU Student Union Elections
‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम, ३० वर्षांनंतर दलित अध्यक्ष

फग्र्युसन महाविद्यालयामध्ये बी. ए. चे शिक्षण घेत असताना १९६८ मध्ये मी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी मी केवळ १८ वर्षांचा होतो. एकसदस्यीय वॉर्ड झाल्यामुळे कोणाला उभे करायचे याविषयी घरामध्ये कार्यकर्ते भाऊसाहेबांशी चर्चा करीत होते. ‘कोणीच तयार होत नसेल तर श्रीकांतला उभे करा’, असे एकाने भाऊसाहेबांना सुचविले. ‘तो अजून मतदारही नाही’ हे भाऊसाहेबांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर माझे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याचे एका इच्छुकाने भाऊसाहेबांना सांगितले. माझ्याविरोधात नागरी संघटनेचे हनुमान अमराळे आणि जनसंघाचे मधुकर मोरे उभे होते.

मी विजयी झाल्यानंतर एका उमेदवाराने मी कायदेशीर सज्ञान नाही या मुद्दय़ावर उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी माझी बाजू मांडली. ‘मतदार यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ हा सज्ञान आहे आणि जो मतदार आहे तो उमेदवार होऊ शकतो, असा युक्तिवाद करीत ही याचिका म्हणजे पश्चातबुद्धी असल्याचे,’ जेठमलानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शेवटी माझ्या नगरसेवकपदावर उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले.

भाऊसाहेब राजकारणी असले तरी घरामध्ये ते आमच्यासाठी वडीलच असायचे. त्यामुळे घरात कधीही राजकारणावर चर्चा होत नसे. निवडणूक लढविली असली तरी मी प्रचारामध्ये कधी भाषण केलेच नाही. भाषण केले ते महापालिकेच्या सभागृहातच. मी नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांची सेवा करतानाच अभ्यासही सुरू ठेवला.

नगरसेवकपदाच्या शेवटच्या वर्षी म्हणजे १९७३-७४ मध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो. त्या वेळी मी कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला होता. त्यामुळे दिवसा राजकारण आणि रात्री अभ्यास अशी माझी दिनचर्या होती. माझ्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळात आम्ही १२ सदस्यांनी बैठकीमध्ये एक-एक महिना चहाचा खर्च केला. त्यामध्ये सध्याचे भाजप नगरसेवक गणेश बिडकर यांचे वडील मधुकर बिडकर माझ्यासमवेत होते. वॉर्डाची फेररचना झाली आणि माझा भाग दुसरीकडे गेल्यामुळे १९७४ आणि १९७९ अशा दोन निवडणुकांमध्ये अपयश आले. मात्र, माझे जिवलग मित्र असलेले हनुमान अमराळे हे नगरसेवक झाले याचा आनंद होता.

माझ्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाल्यानंतर १९९१ मध्ये मी फारशी दगदग न करता पेट्रोलपंपाचा व्यवसाय सांभाळत होतो. एक दिवस गिरीश बापट पंपावर आले आणि ‘श्रीभाऊ तू उभा रहा’, असा त्यांनी मला आग्रह केला. चांगले सभासद आले तर महापालिकेचा कारभार सुधारता येईल, असे म्हणत बापट यांनी मला गळच घातली. त्यामुळे १९९२ च्या निवडणुकीत मी अपक्ष उभा राहिलो. काँग्रेसचे मनोहर नांदे, जनता पक्षाचे प्रभाकर दुर्गे, भाजपचे मधुकर मोरे आणि शिवसेनेचे अतुल दिघे अशा पंचरंगी लढतीत माझा २०० मतांनी विजय झाला. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण हे आमचे दैवत असल्याने त्यांनी आदेश दिल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालो. प्रकृती ठीक नसल्याने या निवडणुकीत मी प्रचारासाठी बाहेर पडलोच नव्हतो. कार्यकर्त्यांना तीन हजार रुपये दिले आणि जसे लागतील तसे मागून घ्या असे सांगितले होते. मात्र, माझ्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्या तीन हजार रुपयांमधील पाचशे रुपये मला परत केले. अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर मी नगरसेवक झालो. माझ्या वॉर्डात सतत आरक्षण आल्यामुळे नंतर कधी निवडणूक लढविलीच नाही.

(शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी)