शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेतून त्या त्या शहराचे प्रतिबिंब दिसत असते. वाहतूक व्यवस्था चांगली असावी यासाठी वाहतूक शाखेकडून वाहनचालकांकडून केवळ दंड आकारण्यावर भर दिला जात असून इतर उपाययोजनांकडे वाहतूक पोलीस आणि महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग यांचे दुर्लक्षच झाल्याचे चित्र शहरात आहे.

शहरातील सिग्नलचे सुसूत्रीकरण (सिंक्रोनायझेशन) करण्यात आलेले नाही. चहुबाजूंनी विस्तारणाऱ्या शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी सिग्नलची गरज निर्माण झाली असली, तरी तेथे सिग्नल बसवण्यात आलेले नाहीत. सिग्नलवर उलटगणती घडय़ाळेही नाहीत. जेथे आहेत तेथील बंद पडली आहेत. त्यामुळे स्मार्ट होणाऱ्या पुण्याची वाहतूक व्यवस्था बिघडवण्यात सिग्नलचा मोठा वाटा असल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळते.

पुणे जसजसे विस्तारत गेले तशी आजुबाजूला असणारी उपनगरे एकमेकांना जोडली गेली. अनेक गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे तसेच आणखी काही गावे पालिकेत समाविष्ट होणार आहेत. मात्र, या विस्ताराचा विचार महापालिकेने केलेला दिसत नाही. सिग्नल यंत्रणा प्रभावी नसेल, तर कितीही प्रयत्न केले तरी वाहतूक व्यवस्था ‘जैसे थे’च राहणार आहे, ही वस्तुस्थिती असल्यामुळे सिग्नल यंत्रणेबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होणे शहरात आवश्यक आहे.

सातारा रस्ता, कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता हे शहरातील तीन प्रमुख रस्ते असून ते रुंद आणि सरळ आहेत. सिंहगड रस्त्याला इतर कोणताही पर्याय नसल्याने या रस्त्यावर मोठी वाहतूक असते आणि येथील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. अशीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात सर्वच शहरात पाहायला मिळते.