दिवाळीपूर्वी बहुतेक कंपन्यांमध्ये बोनस किंवा आगाऊ वेतन दिले जाते. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट मात्र कायम असून आठवडय़ावर दिवाळी आलेली असताना अधिकचे वेतन तर नाहीच, पण कर्मचाऱ्यांच्या हक्काचे दोन महिन्याचे वेतनही संस्थेकडून देण्यात आलेले नाही.

सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या विविध महाविद्यालयांमधील कर्मचारी आणि शिक्षक अद्यापही वेतनापासून वंचित आहेत. संस्थेकडून वारंवार आश्वासने मिळूनही अजूनही कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित मिळत नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना काही वेतन देण्यात आले आहे, मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची दिवाळी अद्यापही अंधारातच आहे. बहुतेक कर्मचारी आणि शिक्षकांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नसल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली. महाविद्यालयाने वेतनाच्या रकमा कर्जाऊ दिल्या आहेत, तर काही कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्यामुळे कर्ज घेऊन घर चालवण्याची वेळ आली आहे. अशा कर्मचाऱ्यांना आता बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्यायही हाती राहिलेला नाही. त्यामुळे दिवाळी साजरी करणे तर दूरच पण उच्चशिक्षण घेऊन अध्यापनासारख्या प्रतिष्ठेच्या क्षेत्रात असूनही रोजचा खर्च भागवणेही अनेकांसाठी कठीण झाले आहे.

‘महाविद्यालयाकडून वेतन देण्याबाबत आश्वासन देण्यात येते. मात्र दोन महिन्याचे वेतन मिळालेले नाही. काही महाविद्यालयांमध्ये एक महिन्याचे वेतन थकवण्यात आले आहे. नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी बँकेकडूनही कर्ज नाकारण्यात येत आहे,’ असे महाविद्यालयांतील शिक्षकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.