यशस्वी होण्यासाठी परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेतच, पण जीवनातील कौशल्ये आत्मसात करणे हेदेखील महत्त्वाचे आहे. झाड जसे वाढते तसे आपण चहुअंगांनी वाढूयात, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी शालेय विद्यार्थ्यांना सोमवारी कानमंत्र दिला.
युनिक फीचर्स आयोजित ‘डॉएच्च बँक-पासवर्ड अर्थसाक्षरता अभियान स्पर्धे’तील विजेत्यांना अवचट यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉएच्च बँकेचे भारतातील प्रमुख प्रशांत जोशी, पुण्यातील प्रमुख राधिका आपटे, युनिक फीचर्सचे संपादक-संचालक सुहास कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी या वेळी उपस्थित होते.
शाळेत असताना मला गणित जमायचे नाही. पाढे पाठ व्हायचे नाहीत. लसावि, मसावि, चक्रवाढव्याज समजायचे नाही; एवढेच काय, स्पेिलगही पाठ व्हायचे नाही. त्यामुळे मला शाळा ही चुकलेली कल्पना आहे असेच वाटायचे, असे सांगून अवचट म्हणाले, प्रत्येक जण वेगळा कल घेऊन आलेला आहे. कुणाला चित्र काढता येते तर, कुणाला कविता येते. मात्र, प्रत्येकाला एकच अभ्यास, एकच पुस्तक, एकच परीक्षा आणि गुणपद्धतीमधून जावे लागते. मार्क्स महत्त्वाचे असले तरी जीवनातील ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. मुलांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचे शिक्षण असले पाहिजे. ‘आयटी’त सुख, समाधान मिळत नाही. शिक्षणाने आपल्याला अहंकार दिला. जीवनाला अनावश्यक आणि घातक गोष्टी टाळून आपल्याला आयुष्य सांभाळता आले पाहिजे.’’
 
पारितोषिकविजेत्या विद्यार्थ्यांची नावे
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता : आदित्य कुलकर्णी, प्रसन्न भोसले, यश सूर्यवंशी, श्री शिवराय प्रतिष्ठान शाळा : अनिशा सणस, कौस्तुभ जाधव, आकाश गायकवाड, एच. एच. सी. पी. गर्ल्स हायस्कूल : प्रतीक्षा भोसले, सोनाली निगडे, नताशा हुणचगी, नूतन संघ संचालित माध्यमिक शाळा कोथरूड : अश्विनी माथवड, गौरव सातपुते, नंदू लोंढे, अहल्यादेवी प्रशाला : मीनल नागू, ऋतुजा दरेकर, ऋतुजा पारसनीस, श्रीमती नाथीबाई ठाकरसी कन्याशाळा : ऐश्वर्या काटकर, गायत्री दुनगुले, लक्ष्मी पुजारी