पिंपरी चिंचवडमधे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामाचं उद्घाटन केलं, मात्र कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्र्यांना १५ मिनिटं नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच ताटकळत उभं रहावं लागलं. पिंपरी चिंचवडच्या रिंगरोड बाधित शेकडो लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या समस्यांचं निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यात काहीशी झटापट झाली. या घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून धरला होता. पोलिसांनी आंदोलकांपैकी एका आंदोलकाला निवेदन देण्यासाठी सोडलं, त्यानं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, तरीही पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष सुरूच होता.

अखेर पोलिसांनी गर्दीतून वाट काढत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला जागा करून दिली ज्यानंतर मुख्यमंत्री पुढच्या कार्यक्रमासाठी जाऊ शकले. मुख्यमंत्री तिथून निघून गेल्यावर शेकडो आंदोलकांनी गोंधळ करत ठिय्या आंदोलन केलं ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र सुमारे एक तास वातावरण तणावाचंच होतं.

काय आहे रिंग रोड प्रकरण?
१९८७ मधील रिंगरोडचा आराखडा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ६५ टक्के तर नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत ३५ टक्के असा हा मार्ग विभागला गेला आहे. मात्र या रोडवरच अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत, त्यांना नोटीस बजावून ती जमीनदोस्त करण्याची कारवाईही प्रशासनातर्फे सुरू आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रिंगरोड बाधित लोक हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या संदर्भात साकडं घालत आहेत. हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यायचं होतं त्यात पोलिसांनी मज्जाव केल्यानं आंदोलन करण्यात आलं.