दिवाळीच्या सुट्टीवरून परतणाऱ्या सगळ्याच प्रवाशांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर संथ गतीने प्रवास करावा लागतोय. कारण द्रुतगती महामार्गाच्या टोलनाक्यांवर गर्दी बघायला मिळते आहे. या गर्दीमुळेच पुणे मुंबई रस्त्यावरची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. एक्स्प्रेस वे हा खरेतर जलद वाहतुकीसाठी ओळखला जातो. पण रविवारी या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावलेला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे आणि सोमवारी सकाळी वेळेत कार्यालय गाठायचे असल्याने अनेकांनी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी आजची संध्याकाळच निवडली आहे. त्यामुळेच हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शुक्रवारी दिवाळीतला पाडवा, शनिवार आणि रविवारची सुट्टी अशा सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी गुरुवारी संध्याकाळीच पुण्याला जाणे  पसंत केले होते. आता ही सुटी संपवून घराकडे परतणाऱ्या सगळ्याच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय.