स्पर्धेतील विजेत्याकडून महापालिकेला टोला

स्मार्ट सिटी स्पर्धेत अनोख्या कल्पना देणाऱ्या विजेत्याला बक्षीस देण्याऐवजी महापालिकेने त्यालाच डावलण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासन विजेत्याची दखल घेईल, जाहीर करण्यात आलेले बक्षीस त्याला देईल ही अपेक्षाच फोल ठरली. उलट या विजेत्याला आयुक्तांच्या दालनात बोलावून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच मंगळवारी आगपाखड केली. किरकोळ रकमेच्या गिफ्ट व्हाऊचरसाठी माध्यमांकडे जाण्याची गरज काय होती, अशा शब्दात महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि स्मार्ट सिटी विभागातील अधिकाऱ्यांनी विजेत्या स्पर्धकाची कानउघडणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेश चव्हाण या विजेत्याने महापालिकेचे गिफ्ट व्हाऊचर तेथेच नाकारले आणि ‘महापालिकेला आर्थिक भरुदड नको,’ असे स्पष्टपणे सांगत बक्षीसही परत केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध स्पर्धा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत प्रशासनाकडून दुसऱ्या टप्प्यात आयोजित केलेल्या स्पर्धेत गणेश चव्हाण याने सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या दरम्यान प्राप्त झालेल्या तीन हजार कल्पनांमधील तब्बल दोन हजार अनोख्या कल्पना त्याने सुचविल्या होत्या. त्यातील काही महापालिकेने स्वीकारल्या आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. या दरम्यान स्पर्धेतील विजेता म्हणून चव्हाण याला प्रथम क्रमांकासाठीचे गिफ्ट व्हाऊचर आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केले. मात्र कित्येक महिने उलटल्यानंतरही आणि अधिकारी प्रतिसाद देत नसल्यामुळे गणेश चव्हाण याने ही कैफियत माध्यमांपुढे मांडली होती. त्याची शिक्षा त्याला प्रशासनाकडून मिळाली. महापालिका आयुक्तांनी त्याला सोमवारी भेटण्यास बोलावले.

या भेटीत काही चर्चा होऊन ठोस निर्णय होईल, असे चव्हाण याला वाटले. मात्र कुणाल कुमार आणि स्मार्ट सिटी विभागातील अधिकाऱ्यांनी माध्यमांकडे गेल्यामुळे त्याला फैलावर घेतले. किरकोळ कारणांसाठी आणि किरकोळ गिफ्ट व्हाऊसचरसाठी माध्यमांकडे का गेलात, अशा शब्दात त्याला सुनावण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर चव्हाण याने त्याला देण्यात आलेले ५००० रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर नाकारले. त्याबाबतचे पत्रही त्याने आयुक्तांना दिले.

उपरोधिक संताप

पाच हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात आल्यामुळे महापालिकेला आर्थिक भरुदड सहन करावा लागत असेल, तर मला गिफ्ट व्हाऊचर नको, अशी विनम्र विनंती करत गणेश चव्हाण याने अधिकाऱ्यांना उपरोधिक चिमटाही घेतला. वाहतुकीची समस्या सर्वच शहरात असते, ती सुटेलच. पदपथही योग्य पद्धतीने होतील. उड्डाणपूल बांधताना काही तांत्रिक चुका टाळल्या जातील, निविदा प्रक्रिया नियमानुसार होईल, अशा उपरोधिक शब्दात संताप व्यक्त करत आपल्या कारकीर्दीत पुण्याची अशीच भरभराट होवो, अशा शुभेच्छाही त्याने महापालिकेला दिल्या आहेत.