स्मार्ट सिटी अभियानासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव एकत्रिरीत्या पाठवण्यात आल्यामुळे नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून स्मार्ट सिटीसाठी पुणे महापालिकेचा स्वतंत्र प्रस्ताव केंद्राला पाठवावा अशी विनंती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील दहा शहरांची शिफारस राज्याने केंद्राकडे करायची होती. त्यानुसार राज्य शासनाने स्मार्ट सिटीसाठी दहा शहरांची शिफारस केंद्राकडे केली आहे. पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिकांनी स्मार्ट सिटीसाठीचे त्यांचे प्रस्ताव स्वतंत्ररीत्या राज्य शासनाला सादर केले होते. केंद्राकडे शिफारस करताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव राज्याकडून एकत्रितरीत्या पाठवण्यात आला असून त्याबाबत महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. स्मार्ट सिटीसाठी पुणे महापालिकेचा समावेश केल्याबद्दल महापौरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून या योजनेमुळे शहराचा सुनियोजित विकास होण्यास निश्चितपणे चालना मिळणार आहे, असे महापौरांनी या पत्रात म्हटले आहे.
स्मार्ट सिटीसाठी प्रस्ताव पाठवताना पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संयुक्त प्रस्ताव पाठवला गेल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये आणि प्रशासनामध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही महापालिकांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. दोन्ही महापालिकांमधील पायाभूत सुविधा आणि भविष्यातील गरजा या बऱ्याच प्रमाणात भिन्न आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही महापालिकांचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव एकत्रितरीत्या पाठवण्यात आल्यामुळे आमच्या शहराला न्याय मिळणार नाही अशी आमची भावना आहे. राज्य शासनाने जो संयुक्त प्रस्ताव पाठवला आहे, त्याबाबत शासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अशा परिस्थितीत लोकांची भावना लक्षात घेऊन पुणे महापालिकेचा स्वतंत्र प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा असे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
स्मार्ट सिटी अभियानात पुणे महापालिकेचा समावेश करून आपण पुणे महापालिकेबाबत व्यापक दृष्टिकोन दाखवला आहे. स्पर्धेच्या पुढील टप्प्यातही पुणे महापालिकेला आपले असेच सहकार्य लाभेल अशीही अपेक्षा महापौरांनी पत्रातून व्यक्त केली आहे.