‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेच्या पदवीदान समारंभाकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पाठ फिरवली. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या काही पदव्यांच्या वैधतेबाबत साशंकता असताना इराणी पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे वृत ‘लोकसत्ता’ ने शनिवारी प्रसिद्ध केले होते.
‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या अभिमत विद्यापीठाचा बाविसावा पदवीदान समारंभ शनिवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र इराणी आणि तावडे यांनी या समारंभाला हजेरी लावली नाही. त्यामुळे विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजीव कुमार आणि कुलगुरू डॉ. राजस परचुरे यांच्या हस्ते पदवीदान समारंभ झाला. या विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या काही पदव्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्यामुळे त्या अवैध ठरत असल्याचा आरोप गोपाळकृष्ण गोखले यांचे पणतू अ‍ॅड. सुनील गोखले यांनी केला होता.
वैधतेबाबत साशंकता असलेल्या पदव्या देण्यासाठी खुद्द स्मृती इराणी येणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केले होते. ‘मंत्र्यांना कुणी चुकीची माहिती दिल्यामुळे ते आले नाहीत. हा संस्थेला बदनाम करण्याचा डाव आहे,’ असे स्पष्टीकरण डॉ. कुमार यांनी या वेळी दिले. ते म्हणाले, ‘गोपाळकृष्ण गोखले यांच्या नावाने सुरू असलेली ही संस्था देश-विदेशात नावलौकिक टिकवून आहे. गोखले यांचा वारसा सांगणाऱ्यांनीच संस्थेची बदनामी करावी हे दुर्दैव आहे. संस्थेचे सर्व अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत. मात्र विद्यापीठाची बदनामी करण्यासाठीच काहीजणांनी मंत्र्यांना चुकीची माहिती दिली असावी.’
‘संस्थेचे कामकाज गेली ८५ वर्षे उत्तम चालले आहे. सर्व अभ्यासक्रम मान्यताप्राप्तच आहेत. संस्थेबाबत होणाऱ्या अशा चर्चानी संस्थेच्या कामकाजावर आणि लौकिकावर काहीही परिणाम होणार नाही,’ असे डॉ. परचुरे यांनी सांगितले.