सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शालेय विद्यार्थ्यांनी ‘दो मुठ्ठी अनाज’ या उपक्रमाच्या माध्यमातून धान्याची रास जमा केली. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीची प्रचिती देत संकलित केलेले धान्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचालित मोफत अन्नछत्रासाठी देण्यात आले.
लष्कर भागातील सरदार दस्तूर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘दो मुठ्ठी अनाज़्’ हा उपक्रम राबविला. त्या अंतर्गत २०० किलो तांदूळ, ८० किलो साखर, २२५ किलो गहू, १० किलो मूगडाळ आणि तेलाचे दोन डबे एवढी धान्याची राशी जमा झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘जय गणेश रुग्णसेवा अभियानां’तर्गत ससून रुग्णालयामध्ये मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या अन्नछत्रासाठी हे धान्य विद्यार्थ्यांनी गणरायाची आरती करून ट्रस्टच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केले. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. मुख्याध्यापिका सविता कामठे यांनी शाळेमध्ये ‘दो मुठ्ठी अनाज़्’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्यासमवेत कुला जगदाळे, सागर तेलगू, साबीन शेख, कुणाल मगर, ईशान मेंडीस, श्रुती कैमाल आणि ४०० विद्यार्थ्यांनी ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष सुनील रासने यांच्याकडे हे धान्य स्वीकारले.
ससूनमधील दीड हजार रुग्णांना दररोज चहा, दूध, नाश्ता, सकाळचे आणि सायंकाळचे जेवण ट्रस्टतर्फे दिले जाते. त्यासाठी लागणारा कोरडा शिधा ट्रस्टतर्फे दररोज पुरविला जातो, असे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.