सामाजिक कार्यकर्त्यां कौसर अन्सारी यांचे मत

शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने समाजात वावरताना आणि स्वत:च्या पायावर उभे राहात असताना आई, वडिलांसह पतीविरुद्ध भूमिका घ्यावी लागली तरी महिलांनी मागे हटता कामा नये. चुकीच्या गोष्टींना नाकारणे ही देखील मोठी ताकद आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां कौसर अन्सारी यांनी मंगळवारी व्यक्त केले. चुकीच्या गोष्टींना नाकारण्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

कॉ. अशोक मनोहर मित्र परिवार समितीच्या वतीने अन्सारी यांना कॉ. अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. मुस्लीम सत्यशोधक समाज संस्थेचे प्रा. शमशुद्दीन तांबोळी, लेखिका ऊर्मिला पवार, समितीचे अध्यक्ष डॉ. अनंत फडके या वेळी उपस्थित होते.

अन्सारी म्हणाल्या, सर्वच जाती, धर्मातील केवळ महिलांवर अत्याचार होतो. आजही मुलगी म्हणून शिक्षण दिले जात नाही, हे समाजातील कटू वास्तव आहे. महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता असून ती योग्य वेळी दाखविण्याचे धाडस अंगी बाणवणे गरजेचे आहे. मुस्लीम समाजातील अनेक मुली बुरखा घालून शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेर पडत असून स्वत:ची ओळख तयार करत आहेत. असे चित्र एका बाजूला असताना अजूनही देशाच्या अनेक भागातील मुस्लीम महिला फतव्याला घाबरून घरी बसतात. त्यांना त्या कोषातून बाहेर काढून स्वत:च्या पायावर उभे करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

‘महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही त्यांनी समान नागरी कायद्याला अद्याप हात घातलेला नाही. समान नागरी कायदा, तिहेरी तलाकबाबत न्यायासाठी ठोस भूमिका न घेता विरोधक, सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत. मुस्लीम समाजात सुधारणा करताना कुराण, इस्लाम एका हद्दीपर्यंत साथ देतील मात्र, देशाचे संविधान शेवटपर्यंत सोबत करेल. त्यामुळे धर्मापेक्षा संविधानाशी आपण जोडले गेले पाहिजे. मुस्लीम समाजातील महिलांनी सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. याबरोबरच त्या अन्याय, शोषणाविरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यांचा उल्लेख इतिहासात करावा लागेल. मुस्लीम महिलांच्या या कामाचा इतिहास लिहिणे आवश्यक आहे’, असे तांबोळी यांनी सांगितले.

मक्तेदारी संपुष्टात येण्याच्या भीतीनेच तिहेरी तलाकला विरोध

तिहेरी तलाक देण्याचा अधिकार पुरुषांच्या हातून गेल्यास मुस्लीम समाजातील महिलांना बरोबरीचे अधिकार मिळतील आणि आपली मक्तेदारी संपुष्टात येण्याच्या भीतीनेच तिहेरी तलाकला कट्टरवादी मुस्लीम, मौलवींचा विरोध आहे. कुराणातील सोयीच्या गोष्टीच मौलवी समाजावर लादत आहेत. आता महिलाही कुराणाचा आधार घेऊन त्यामध्ये उल्लेख केलेल्या महिलांच्या अधिकाराबाबत बोलू लागल्या आहेत, असे अन्सारी यांनी सांगितले.