ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां पद्मा अनंतराव चाफेकर (वय ९१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यां तसेच तळेगाव येथील उद्योगधाम या संस्थेच्या संस्थापक होत्या. त्यांच्या पश्चात तीन कन्या आहेत.

पद्माताईंनी स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करण्याची भूमिका पार पाडली होती. ‘उद्योगधाम’चे संस्थापक अनंतराव चाफेकर यांच्या त्या पत्नी होत्या. या संस्थेची उभारणी करून ‘अनिकेत निकेतन वसतिगृहा’च्या माध्यमातून कुष्ठरोगी व त्यांच्या बालकांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  तळेगावमध्ये प्रौढ साक्षरतेसाठीही त्या प्रयत्नशील होत्या. पद्माताईंनी मराठीतील पंधरा व गुजराती भाषेतील तीन पुस्तके दृष्टिहिनांसाठी ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिली होती. गुजरातीतील आणखी एक पुस्तक ब्रेल लिपीत आणण्याचे काम त्यांनी जवळजवळ पूर्ण करत आणले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव मरणोत्तर नेत्रदान व देहदानासाठी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.