संगणक अभियंता पतीविरूद्ध गुन्हा
पतीच्या छळाला कंटाळून संगणक अभियंता महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ( ११ जून) धनकवडी परिसरात घडली.
चमेली अमित गुटाळ (वय २८, रा. काशीनाथ पाटील नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमित (वय ३२) याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चमेलीचे बंधू महेश नवले (वय ३२, रा.चिंचवड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमेली खराडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता होत्या. तिचा पती अमितसुद्धा संगणक अभियंता आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा विवाह झाला होता. अमेरिकेत शिक्षणासाठी जायचे आहे, त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी अमित याने तिच्याकडे केली होती. त्यानुसार चमेलीचा भाऊ महेश याने तीन लाख रूपये अमितला दिले. त्यानंतर अमितने बावीस लाख रुपयांचे कर्ज एका बँकेकडून घेतले. त्यासाठी चमेलीला जामीनदार म्हणून राहण्यास सांगितले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. दरम्यान फेब्रवारी २०१६ मध्ये निकाल लागला. अमित अनुत्तीर्ण झाल्याने तो चमेलीवर चिडला होता.
त्याने चमेलीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ महेश यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अमित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस.एम.खानविलकर तपास करत आहेत.