शासकीय कार्यालयांनी व संलग्न संस्थांनी विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर करावा, याचा प्रचार- प्रसार करण्यासाठी पुण्यातील सौरभ कुंभार व संतोष खोमणे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांना दुचाकीवरुन भेट देणार आहेत. ही दुचाकी फेरी १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत चालणार आहे.
छतावर बसवण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा उपकरणांच्या साहाय्याने ‘नेट मिटरिंग’द्वारे ऊर्जावापर व्हावा, असे निवेदन ३४ जिल्ह्य़ांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना देण्यात येणार आहे. ‘सौर पॅनलच्या किमती आता तुलनेने कमी झाल्या असून सहा वर्षांपूर्वी ९० ते १०० रुपये प्रति व्ॉट दराने मिळणारे सौर पॅनल आता ४० ते ४५रुपये प्रती व्ॉट दरानेही उपलब्ध होऊ लागले आहेत. या पॅनलना असलेली मागणी वाढल्यास किमती आणखी कमी होऊ शकतील,’ असे कुंभार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दुचाकी फेरीत १ डिसेंबर रोजी सातारा व सांगली येथील जिल्हा मुख्यालयास, तर फेरीच्या शेवटी ३० डिसेंबरला पुणे जिल्हा मुख्यालयास भेट दिली जाणार आहे.