शाळकरी मुलांना दप्तरओझ्याची समस्या नेहमीच सतावत असते. सरकारी पातळीवरून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्नही बऱ्याचदा होत असलेले दिसतात. मुलांच्या दप्तरात सर्वात जास्त ओझे असते ते पुस्तकांचे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीही चर्चा होत असते. त्यावर अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व विषयांची एक पुस्तिका बनवण्याची अभिनव कल्पना वैशंपायन परिवाराने राबवली आहे.
यामध्ये इयत्ता सहावीच्या पुस्तकांची तिमाही, सहामाही अशी अभ्यासक्रमाची विभागणी करून त्या त्या कालावधित शिकवला जाणारा भाग प्रथम वेगळा काढण्यात आला. त्यानंतर एका तिमाहीत शिकवला जाणारा सर्व अभ्यासक्रम स्पायरल बाइंडिंग करून एका पुस्तिकेच्या स्वरूपात तयार करण्यात आला. परिणामी अभ्यासक्रम एकाच पुस्तिकेत समाविष्ट झाल्याने दररोज सर्व पुस्तके न्यावी लागण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका झाली. अशा प्रकारे चार पुस्तिकांमध्ये संपूर्ण वर्षभराच्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली आहे. तसेच विषयाबाबत अधिकची माहितीदेखील समाविष्ट करण्यात आली आहे.
सध्या ही कल्पना प्रायोगिक स्तरावर असून त्यासाठी पुणे विद्यार्थी गृह या शाळेच्या एका वर्गाची निवड करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सुधीर यशवंत यांनी सांगितले की, हा प्रयोग विद्यार्थी आणि शिक्षकांना अतिशय आवडला आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांचे वजन सुमारे ९६० किलोग्रॅम एवढे भरते. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्यात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. अन्य शाळांनी मागणी केल्यास त्यांनाही याबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आलेला खर्च वैशंवायन परिवारातर्फेच करण्यात आला आहे.