पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांची महापौरपदाची मुदत संपण्यापूर्वी ‘जाता-जाता’ त्या स्पेनला जाणार होत्या. मात्र, दोन सर्वसाधारण सभा असल्याचे कारण देत त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.
स्पेन येथे १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ‘स्मार्ट सिटी एक्सपो वर्ल्ड काँग्रेस २०१५’ या परिषदेस महापौर उपस्थित राहणार होत्या. संयोजकांकडून निमंत्रण प्राप्त झाल्यानंतर महापौर व राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता साळुंके यांच्यासाठी होणाऱ्या संभाव्य खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली होती. मुदत संपण्यापूर्वी ‘जाता-जाता’ परदेश दौऱ्याची संधी महापौरांना परिषदेच्या निमित्ताने मिळाल्याने ठराव कायम होण्याची वाट न पाहता मंजुरी देण्याची तत्परता स्थायी समितीने दाखवली. तथापि, नोव्हेंबर महिन्याची नियमित सभा २० तारखेला व आधीची तहकूब सभा १६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे आपल्याला दौऱ्यात सहभागी होणे शक्य होणार नसल्याचे कारण देत महापौरांनी हा दौरा रद्द केला आहे.