नोंदणी न केलेल्यांना आणखी एक संधी
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांनाही शासनाने दिलासा दिला आहे. सामायिक प्रवेश परीक्षेतून प्रवेशासाठी पात्र ठरूनही वेळापत्रकानुसार कागदपत्रांची पडताळणी न झाल्यामुळे केंद्रीय प्रवेश फेरीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण शास्त्र या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील बहुतेक अभ्यासक्रमांच्या आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) पात्र ठरूनही अनेक विद्यार्थी केंद्रीय प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नव्हते. त्याचा फटका विद्यार्थ्यांबरोबरच रिक्त जागा भरण्याची धडपड करणाऱ्या शिक्षणसंस्थांनाही बसणार होता. त्या पाश्र्वभूमीवर प्रवेशाच्या पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही केंद्रीय प्रवेश फेरीत स्थान मिळावे अशी मागणी करण्यात येत होती. ‘लोकसत्ता शिक्षणसंवाद’ या कार्यक्रमातदेखील संस्थाचालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यावेळी ‘पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या परंतु नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विचार करण्यात येईल,’ असे आश्वासन तावडे यांनी दिले होते.
त्यानुसार सीईटी दिलेल्या परंतु केंद्रीय प्रवेश फेरीत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

वेळापत्रक जाहीर करणार
ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे, मात्र प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली नाही किंवा दिलेल्या मुदतीत ज्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही त्यांच्यासाठी पाचवी फेरी आयोजित करण्यात येणार आहे. चार फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी ही फेरी घेण्यात येणार आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाची चौथी फेरी झाली, की त्या त्या अभ्यासक्रमाच्या पाचव्या फेरीचे वेळापत्रक आणि प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात येणार आहे.