पुण्यातील लोकबिरादरी मित्र मंडळातर्फे थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या साहित्यावर आधारित ‘करुणोपनिषदे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे दोन प्रयोग गुरुवारी (७ मे) मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथे दुपारी ४.३० आणि सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. या कार्यक्रमातून उभा राहणारा निधी गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केली असून, यामध्ये स्वत: सोनाली, प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, चंद्रकांत काळे आणि अंजली मराठे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे दिग्दर्शन चंद्रकांत काळे यांनी केले आहे, तर नरेंद्र भिडे यांनी याला संगीत दिले आहे.
आमटे कुटुंबीयांचे काम जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचावे आणि हेमलकसा येथील दवाखान्याच्या पुनíनर्माणासाठी अधिकाधिक मदत तिथे पाठवता यावी, हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. त्यामुळे त्याला मोठय़ा संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी १०० रुपयांची देणगी प्रवेशिका आहे. त्यासाठी ९२२६९५८८८८, ९८५००२११७४ किंवा ९७६७७८९५२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.