सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे चालक आणि वाहक हे दिवाळीच्या दिवशी कुटुंबापासून दूर आहेत. संपात सहभागी झालेले एसटीचे चालक पी. व्ही. चांडेश्वरे यांच्या मुलाने त्यांना आज फोनवरुन ‘पप्पा, तुम्ही घरी कधी येणार…’ असे विचारले. मुलाच्या या प्रश्नाने ते क्षणभर भावूक झाले. मात्र, संपात सहभागी असल्याने मुलाच्या प्रश्नाला नेमके उत्तर देणे त्यांनी टाळले. चांडेश्वरे यांच्या कुटूंबात कमावणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्यासारखी परिस्थिती असणारे असे अनेक चालक, वाहक या संपात सहभागी झाले आहेत.

चांडेश्वरे (वय ४३) हे गेली आठ वर्षे चालक म्हणून एसटी खात्यात काम करीत आहेत. त्यांचं मूळ गाव हे लातूर जिल्ह्यामधील हेळंब हे आहे. सध्या उद्गीर-वल्लभनगर या एसटीवर चालक म्हणून ते पुण्यात आले आहेत. वल्लभनगर येथील आगारात ते सध्या संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे कुटुंबापासून ४२० किमी दूर असल्याने त्यांना कुटूंबियांसोबत दिवाळी साजरी करता येणार नाही.

आमचा पगार कुटुंबाच्या पालन पोषणासाठी कमी पडत असल्यानेच संपाची ही वेळ आल्याचे एसटी चालकांनी सांगितले. पगार कमी त्यात कुटूंबात खाण्यासाठी अनेक तोंडं मग एवढासा पगार कसा पूरणार असा सवाल त्यांनी केला आहे. लोकसत्ता.कॉमने संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चांडेश्वर यांच्या घरात आई, पत्नी, बहीण, दोन मुलं आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. भाऊ कॉलेजमध्ये आहे. तर, बहीण घरीच असते. कुटूंबातील सर्व काही चांडेश्वरे यांच्या पगारात भागवावे लागते. चांडेश्वरे यांना महिन्याला ५ हजार रुपये एवढा बेसीक पगार मिळतो. ओव्हरटाईम करूनही त्यांना कसाबसा महिन्याला १२, ४३६ रुपये एवढा पगार मिळतो. कुटूंबाच्या इतर अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी त्यांना एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेमधून दरवर्षी ७० ते ८० हजार रुपये एवढे कर्ज मिळते. यावर्षी त्यांनी हे कर्ज घेतले आहे. त्याचे पैसे पगारातून वजा होऊन नुकताच त्यांचा पगार झाला. मात्र, हातावर केवळ २ हजार ४७९ रुपयेच पडल्याचे त्यांनी सांगितले. आता या तुटपूंज्या पगारात घर कसं भागवायचं असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

कर्तव्यावर असल्याने दरवर्षीच आमची दिवाळी बाहेरगावीच असते. आजही आहे परंतू ती आमच्या हक्कासाठी असल्याचे चांडेश्वरे सांगतात. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. उद्गीर येथे ते भाड्याच्या घरात राहतात. हे सर्व करताना चांडेश्वरे यांची दमछाक होत आहे. यापूर्वी ट्रक चालक म्हणून काम करीत होतो, एसटीमध्ये अच्छे दिन येतील आणि पगार चांगला मिळेल असे त्यांना वाटले होते. पण, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती सध्या असल्याचे ते सांगतात.

सध्या आंदोलनाला बसलेल्या ३०० ते ४०० एसटी कर्मचाऱ्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील स्थानिक कर्मचारी वर्गणी काढून त्यांना जेवू घालत आहेत. मात्र, सध्याची संपाची स्थिती आणखी किती दिवस कायम राहणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.