शहराच्या ५० उपेक्षित कामगार सेवावस्त्यांमधील ६०० कलाकारांचा सहभाग असलेले ‘समरसता’ या संकल्पनेवरील महानाटय़ रविवारी (२४ जानेवारी) शनिवारवाडय़ाच्या खुल्या रंगमंचावरून सादर होणार आहे. १० ते ४० वर्षे वयोगटातील हे कलाकार त्यांच्या जीवनामध्ये प्रथमच रंगमंचावर पाऊल ठेवणार असून या महानाटय़ाचा वेगवेगळ्या ठिकाणी सराव सुरू आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांचे औचित्य साधून ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. संस्थेच्या मकर संक्रमण उत्सवामध्ये शनिवारवाडय़ाच्या खुल्या रंगमंचावर रविवारी सायंकाळी सहा वाजता या महानाटय़ाचा प्रयोग होणार आहे. बेरड आणि देवदासींच्या उत्थानासाठी जीवन समर्पित करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-लेखक डॉ. भीमराव गस्ती यांच्या हस्ते दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचा उल्लेखनीय कामाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती स्व-रूपवर्धिनीचे कार्यवाह ज्ञानेश पुरंदरे यांनी शुक्रवारी दिली.
‘समरसता’ या संकल्पनेवरील या महानाटय़ातून आर्य चाणक्य, सम्राट चंद्रगुप्त, संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या हिमालयाएवढय़ा कामाची ओळख करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मंदार परळीकर यांनी या महानाटय़ाची संहिता लिहिली असून महेश लिमये यांनी महानाटय़ाला संगीत दिले आहे. सध्या शहरामध्ये वेगवेगळ्या १६ ठिकाणी या महानाटय़ातील प्रसंगांचे सराव सुरू आहेत. शनिवारी (२३ जानेवारी) शनिवारवाडय़ावर प्रथमच रंगीत तालीम होणार असून रविवारी सलग प्रयोग सादर होणार असल्याची माहिती पुरंदरे यांनी दिली. स्व-रूपवर्धिनीचे शाखाविभागप्रमुख नीलेश धायरकर आणि वैदेही बेहेरे या वेळी उपस्थित होते.