उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पिंपरी पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली करवाढ स्थायी समितीने फेटाळली आहे. वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर यापूर्वीचेच कर कायम ठेवून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव पालिका सभेकडे पाठवण्यात आला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रशासनाने मांडलेला करवाढीचा प्रस्ताव सदस्यांनी एकमताने फेटाळला. वर्षभरानंतर पालिका निवडणुका आहेत. करवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होईल, या धास्तीने सत्तारूढ राष्ट्रवादीने तूर्त करवाढ न करण्याची भूमिका घेतल्याने स्थायी समितीने करवाढीच्या बाबतीत ‘जैसे थे’चा निर्णय घेतला. येत्या सभेत अंतिम निर्णय होणार आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून करवाढ आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत असून यासंदर्भात आयुक्त सत्ताधारी नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.