आचारसंहिता पालनावर लक्ष ठेवण्यासाठी ‘कॉप’ अ‍ॅप; तरीही प्रचारावर नियंत्रण ठेवणे जिकरीचे

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचार सुरू असताना आचारसंहितेचे पालन होत आहे वा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कॉप (सीओपी – सीटिझन ऑन पोर्टल) हे अ‍ॅप तयार केले आहे. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास तातडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होणार आहे. मात्र, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, हाइक, लिंक्डेन आदी विविध समाजमाध्यमांवरून निवडणुकीच्या दरम्यान होणाऱ्या प्रचारावर तांत्रिकदृष्टय़ा नियंत्रण मिळवणे, हे तसे जिकिरीचे काम असून त्याला मर्यादाच आहेत, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.फेसबुक या समाजमाध्यमातून होणाऱ्या प्रचाराबाबत तक्रार केल्यास संबंधित फेसबुक पेज आणि फेसबुक खाते ब्लॉक करता येते. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डेन या समाजमाध्यमांवरही तात्पुरत्या स्वरूपात बंधने घालता येऊ शकतात. व्हॉट्स अ‍ॅपवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांबाबत तक्रार आल्यानंतर संबंधित क्रमांक ब्लॉकही होऊ शकतो.

संदेश फिरविणारा एक क्रमांक बाद झाल्यानंतरही अन्य कितीही व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावरून संदेश प्रसारित करणे शक्य असते. त्यामुळे किती क्रमांकांबाबत तक्रारी करणार आणि निवडणूक आयोग किती व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकांवर बंदी घालणार याला मर्यादा आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनॉल्ड ट्रम्प यांनी लिंक्डेनवरून प्रचार केला होता. तेव्हापासून प्रचारासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात येऊन लिंक्डेन प्रकाशझोतात आले.

राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून उर्वरित दोन दिवसांत उमेदवार, पक्ष, उमेदवारांचे समर्थक समाजमाध्यमांमधूनच प्रचार करतील. मात्र, तक्रार झाल्यानंतर ती दाखल होऊन कार्यवाही होईपर्यंत निवडणुका पार पडतील. त्यामुळे समाजमाध्यमांमधून होणाऱ्या प्रचाराला तांत्रिकदृष्टय़ा मर्यादा येत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

अशी कार्यवाही होईल

’ निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर आयोग शहानिशा करून तक्रार दाखल करणार

’ निवडणूक आयोग पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करणार

’ सायबर सेल तक्रारीची शहानिशा करून तक्रार दाखल करून घेणार

’ सायबर सेल फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, हाइक आदींच्या भारतातील मुख्यालयाशी संपर्क साधून त्यांना तक्रार दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीच्या खात्याबाबत माहिती देणार

’ त्यानंतर ते खाते ब्लॉक करण्यात येईल

मुळात व्हॉट्स अ‍ॅप हे अ‍ॅप्लिकेशन आहे. ते आपण डाउनलोड करू शकतो. त्याचप्रमाणे डिलिटही करू शकतो. त्यामुळे त्याच्यावर बंधने आणण्यावर तांत्रिकदृष्टय़ा मर्यादा आहेत, तर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डेन, हाइक यांचे थेट खाते बंद केल्यास त्यावरून प्रसारित होणारा मजकूर थांबू शकतो.

– अजिंक्य चाटुफळे, सॉफ्टवेअर अभियंता