विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रालाही उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. या तिन्ही विभागांमध्ये काही तुरळक अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणचे तापमान ४० अंशांहून अधिक आहे. शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक तापमान (४५ अंश सेल्सिअस) वर्धा येथे नोंदवले गेले. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी व रविवारी उष्णतेच्या लाटेची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
संपूर्ण राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदींनुसार नागपूर (४४.२ अंश), चंद्रपूर (४४.६ अंश), ब्रह्मपुरी (४४.० अंश), परभणी (४४.० अंश), अकोला (४४.५ अंश) आणि मालेगावमध्ये (४४.८ अंश) उन्हाचा ताप चांगलाच जाणवला. तर, सोलापूर (४३.७ अंश), जळगाव (४३.६ अंश), अमरावती (४३.२ अंश) आणि यवतमाळमध्येही (४३.० अंश) तापमान त्रासदायक रीत्या अधिक राहिले. मध्य महाराष्ट्रात केवळ नाशिक (३९.९ अंश) आणि महाबळेश्वरचा (३६.४ अंश) अपवाद वगळला, तर सगळीकडे पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून पुण्यात शुक्रवारी ४०.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.
कोकण आणि गोव्यातही तापमान अधिकच असून मुंबईत शुक्रवारी ३४.१ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात १६ आणि १७ एप्रिलला उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले.