शिल्पकाराने मोठय़ा कष्टाने घडविलेले पुतळे प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यावर थांबून पाहणे नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवरील पुतळे एकाच ठिकाणी उभारून त्यांचे स्मारक करावे, अशी सूचना ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी केली.
पुणे पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर यांना पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी मंगेश तेंडुलकर बोलत होते. महापौर दत्ता धनकवडे, बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणपिसे, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, अ‍ॅड. सुभाष मोहिते, विजयकांत कोठारी आणि पन्नालाल लुणावत या वेळी उपस्थित होते.
मंगेश तेंडुलकर म्हणाले, पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याने येता-जाता मान वर करून पुतळ्याकडे पाहू लागलो तर, आपण सुखरूपपणे जाऊ की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शिल्पकाराने मोठय़ा मेहनतीने आणि कलाकुसरीने घडविलेला पुतळा कोणाचा आणि त्या व्यक्तीचा इतिहास जाणून घेता येणे शक्य होत नाही. म्हणून हे सर्व पुतळे एकाच ठिकाणी ठेवल्यास त्यांचे सार्थकही होईल आणि इतिहासाचे जतन देखील केले जाईल.
जनतेकडून दिला जाणारा सन्मान हा पद्म पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो. ज्या कलेने हा बहुमान मिळाला, त्या शिल्पकलेचा गौरव असल्याची भावना बी. आर. खेडकर यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात डॉ. सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर केला.