मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे मत
इंग्रजी बोलता आले नाही, तर जगाच्या मागे पडू, हा न्यूनगंड मराठी माणसाच्या मनात खोल रुजला आहे. इंग्रजी आत्मसात करत असताना मराठीचे संवर्धन आणि सक्षमीकरणासाठी शासनाने कठोर निर्णय घेणे भाग आहे, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी निगडीत व्यक्त केले.
मधुश्री कला आविष्कार आयोजित व्याख्यानमालेचे डॉ. मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर, ‘मराठी, काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शैलजा मोरे होत्या. संस्थापक माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, महाराष्ट्रात १२ कोटी लोक मराठी आहेत. जगात १५ व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. ज्ञानेश्वरांच्या काळातील तसेच शिवछत्रपतींच्या व तुकोबांच्या काळातील मराठी, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आजची मराठी यात लक्षणीय बदल झालेले आहेत. सातवाहन राज्याच्या ४०० वर्षांच्या कालखंडात मराठी भाषेला अतिशय महत्त्व होते. मात्र, त्यानंतरच्या राजघराण्यांनी मराठी थारा दिला नाही. परिणामी, तिची पीछेहाट झाली. बाराव्या शतकात यादवांचे राज्य आल्यानंतर मराठी भाषेला ऊर्जितावस्था लाभली. ‘लीळाचरित्र’ व ‘ज्ञानेश्वरी’मुळे प्राकृत मराठीने सुवर्णयुग अनुभवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहारकोश मराठीतून सिद्ध केला. ब्रिटिश सत्तेनंतर मराठी पुन्हा मागे पडली. भाषावार प्रांतरचना होऊनही मराठीची उपेक्षाच झाली. मराठी माणूसही टिकला पाहिजे आणि मराठी भाषाही टिकली पाहिजे, असे वाटत असल्यास मराठीबरोबर इंग्रजी आत्मसात करणे, याला पर्याय नाही. राजसत्तेला त्यासाठी काही कठोर निर्णय घेणे भाग्य आहे.
प्रास्तविक सलीम शिकलगार यांनी केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वाकनीस यांनी आभार मानले.