एफटीआयआयच्या नव्या अभ्यासक्रमात शिक्षणपद्धतीत सुधारणांसाठी महत्त्वाचे पाऊल

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) राबवण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमात प्रथमच विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षकांच्याही मूल्यमापनास सुरुवात होणार आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक भाग (मॉडय़ूल) पूर्ण करताना शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीविषयी लेखी अभिप्राय देणार असून असाच अभिप्राय विद्यार्थ्यांकडूनही घेतला जाणार आहे. शिक्षण व शिक्षणपद्धतीत सुधारणा करण्याबरोबरच अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल, असे संस्थेचे म्हणणे आहे.

संस्थेचे संचालक भूपेंद्र केंथोला, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी व इतर शिक्षकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत नवीन अभ्यासक्रम सादर केला. हा अभ्यासक्रम सहा सेमिस्टरमध्ये विभागण्यात आला असून प्रत्येक सेमिस्टर वीस आठवडय़ांची असेल. तसेच ‘इन्ट्रा डीपार्टमेंटल इलेक्टिव्ह’मध्ये एका विद्यार्थ्यांला काही काळ दुसरा अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमात वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते. मात्र,हे मूल्यमापन केवळ गुणात्मक असून विद्यार्थ्यांची कामगिरी वर्षभर कशी राहिली हे त्यातून कळत नाही.

एका सेमिस्टरमध्ये आणखी एकदाच संधी

आता विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सेमिस्टरला ७५ टक्के उपस्थिती गरजेची आहे. परंतु वैद्यकीय वा इतर गंभीर कारणांमुळे विद्यार्थी संस्थेत काही काळ उपस्थित राहू शकला नाही व त्यामुळे महत्त्वाच्या विषयांचा भाग शिकायचा राहून गेला तर त्या विद्यार्थ्यांसाठी तो भाग शिकवण्याची व्यवस्था केली जाईल. परंतु विद्यार्थी बराच काळ अनुपस्थितच राहिल्यास राहिलेला अभ्यास भरुन काढणे अवघड होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांला त्या सेमिस्टरला केवळ एकदा पुन्हा बसता येईल.

अशा रितीने प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा सेमिस्टरसाठी एकूण सहा वेळा पुन्हा बसण्याची संधी मिळू शकेल. तीन वर्षांचा अभ्यासक्रम तीनच वर्षांत संपावा अशी संस्थेची अपेक्षा असून काही कारणांमुळे विद्यार्थी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करु शकला नाही तर तो अभ्यासक्रम अधिकृतरीत्या संपल्याचे जाहीर करेपर्यंत विद्यार्थी संस्थेत राहू शकेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मूल्यमापन हे प्रथमच होणार असून त्यामुळे शिक्षणपद्धती अधिक चांगली होईल. आताच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांकडे चार आठवडय़ांसाठी दुसरा विषय शिकण्याची व दुसऱ्या संस्थेत जाऊन शिक्षण घेण्याचा पर्याय आहे. चित्रपट संस्थेतील श्रेयांक पद्धती इतर संस्थांपेक्षा वेगळी असते. संहितालेखनासारख्या गोष्टी ठरावीक दिवसांत झाल्याच पाहिजेत असे म्हणता येत नाही, परंतु म्हणून वर्षांनुवर्षे संहिता तयार झालीच नाही असेही चालत नाही. या समस्येवर उपाय म्हणून आता विद्यार्थ्यांला अभ्यासक्रमाचे भाग टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.

अमित त्यागी, अधिष्ठाता, चित्रपट विभाग

 

विद्यार्थ्यांमधील ताण ओळखण्यासाठी शिक्षकांना धडे

‘एफटीआयआय’मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण ओळखून वेळीच विद्यार्थ्यांला समुपदेशकांची मदत देता यावी, यासाठी शिक्षकांना धडे देण्यात आल्याची माहिती संचालक भूपेंद्र केंथोला यांनी दिली. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. एफटीआयआयमधील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते, शिवाय श्रेयांक पद्धतीत विद्यार्थी अभ्यासात अधिक व्यस्त राहतील, असे त्यांनी सांगितले.