‘तुम्ही किती शिकला आहात?’ असा प्रश्न तिसरीतील एका मुलीने अगदी निरागसपणे बोगस पदवीच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना गुरुवारी विचारला. या विद्यार्थिनीच्या प्रश्नावर क्षणभर हशा पिकला, मात्र शिक्षणमंत्र्यांनी आपला बायोडेटा सांगून आता राजकारणात शिक्षण घेत असल्याचे सावध उत्तर दिले.

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने आणि शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या सहकार्याने शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सादरीकरण तावडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार बाळा भेगडे, मुथ्था फाऊंडेशनचे शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते. तावडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांना शाळा आवडते का, काय शिकवले जाते, स्वच्छतेविषयी काय शिकवले जाते हे विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले. यावेळी मुलांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आल्यानंतर तिसरीतील विद्यार्थिनी हर्षदा देशपांडे हिने शिक्षण मंत्र्यांना तुम्ही किती शिकलता? असा प्रश्न विचारला. त्यावर ‘मी दहावी, बारावी, ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्याचे सावधपणे पण दिलखुलासपणे सांगितले. यावेळी तावडे म्हणाले, ‘मूल्यवर्धित शिक्षण हे मुलांच्या आयुष्यात बदल घडविते. मुलांना समाजाचा विचार करण्याची दिशा देते. मूल्यवर्धित शिक्षकांमुळे या मुलांचे समाजाशी नाते जोडले जाते. हे शिक्षण नियमित शिक्षण अभ्यासक्रमाला पूरक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मूल्यवर्धित शिक्षण चांगल्या पध्दतीने आत्मसात करावे.’

सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने

  • सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. तरुणांना शिक्षण, रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री एक योजना तयार करीत आहेत. ते लवकरच त्याबाबत घोषणा करतील. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबतही चर्चा सुरू आहे.’ असेही तावडे यांनी सांगितले.