विद्यार्थी निवडणुकांचे महाविद्यालयांपुढे आव्हान

नव्या विद्यापीठ कायद्यानुसार येऊ घातलेल्या विद्यार्थी निवडणुका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी, या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयांचे प्राचार्य आता धास्तावले आहेत. विद्यार्थी संघटनांचा धुडगुस आटोक्यात ठेवणे, निवडणुकांच्या काळात महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आव्हानात्मक असल्याचे मत प्राचार्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्याच महिन्यापासून लागू झालेल्या नव्या विद्यापीठ कायद्यात निवडणुकांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद निवडण्याची तरतूद आहे. येत्या काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. या निवडणुकांचे नेमके स्वरूप कसे असेल याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी येत्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्याच्या कल्पनेने ज्येष्ठ प्राध्यापक, प्राचार्य धास्तावले आहेत. विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी, गेल्यावर्षी फग्र्युसन महाविद्यालयात झालेला गोंधळ या पाश्र्वभूमीवर या संघटनांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षेची काळजी घेणे आव्हानात्मक असल्याचे मत प्राचार्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘महाविद्यालयांची सुरक्षा व्यवस्था कितीही कडक केली तरी अगदी प्रत्येक कोपऱ्यापर्यंत लक्ष ठेवणे अशक्य आहे. सगळ्याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांची किरकोळ भांडणे, मारामाऱ्या होत असतात, त्याच्या तक्रारीही येत असतात. मात्र संघटनांना राजकीय पाठिंबा असतो. पक्षांच्या अस्मिता त्याला चिकटलेल्या असतात. त्यामुळे अशा विद्यार्थी संघटनांच्या भांडणातून महाविद्यालयांचे शैक्षणिक वातावरण बिघडून जाते. राजकीय पाश्र्वभूमीच्या संघटनांना प्रवेश न देता या निवडणुका झाल्या तरच त्या शिक्षणसंस्थांना झेपू शकतील आणि त्याचा हेतूही साध्य होईल. अन्यथा, संघटनांचे कार्यकर्ते निवडणुकांसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन या निवडणुका पुन्हा राजकीय पक्षांच्या आपापसातीलच राहतील,’ असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी व्यक्त केले.

स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणाले, ‘महाविद्यालयांचे मोठे परिसर, विद्यार्थ्यांची संख्या या पाश्र्वभूमीवर निवडणुका घेणे महाविद्यालयांसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. निवडणुकांच्या काळात बाहेरील शक्ती कार्यरत होतात त्यावर नियंत्रण ठेवणे, निवडणुका शिस्तीत होण्यासाठी आधीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनांनीही शिक्षणसंस्थांच्या शिस्तीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.’ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी.बी. आहुजा यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांचे हेतू किंवा मुद्दे काही वेळा रास्त असतात. मात्र समूह मानसिकतेचा विचार केला तर परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे निवडणुकांच्या काळात परिसराची सुरक्षा राखणे खरंच आव्हानात्मक आहे.’  प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम म्हणाले, ‘निवडणुकांबाबतची नियमावली करताना प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही विश्वासात घ्यावे. संघटना, गट हे महाविद्यालयांतीलच असावेत. कोणत्याही राजकीय संघटनेला किंवा विद्यार्थी संघटनेला प्रवेश देऊ नये. महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थ्यांनाच यामध्ये सहभागी होता यावे. पैशाच्या वापरावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.’