इंग्लंडच्या ‘नॅशनल हेल्थ सव्र्हिस’ या सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या बऱ्याच आरोग्य सुविधा मोफत पुरवणाऱ्या सेवेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या डॉक्टरांचा चमू मँचेस्टर दौऱ्यावर जाणार आहे.
आयएमए पुणे शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी झाला. या वेळी अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी या दौऱ्याबाबत घोषणा केली. ‘हा दौरा सप्टेंबरमध्ये व स्वखर्चाने जाणार असून त्यात चाळीस डॉक्टर असतील. तिथल्या ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’चे त्यासाठी सहकार्य मिळाले आहे,’ असे त्यांनी सांगितले.
डॉ. जोशी यांच्यासह आयएमए पुणे शाखेच्या उपाध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर, सचिव डॉ. आरती निमकर, डॉ. बी. एल देशमुख, सहसचिव डॉ. राजकुमार शहा, विश्वस्त डॉ. संजय पाटील यांनी या वेळी पदग्रहण केले. प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुराद लाला, डॉ. शिरीष प्रयाग, पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर, पुढील वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉ. प्रकाश मराठे, राज्यातील आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. अरुण हळबे या वेळी उपस्थित होते. डॉ. लीलाबाई गोखले, डॉ. दिलीप देवधर आणि डॉ. आशिष काळे यांचा या वेळी त्यांच्या विशेष कार्याबाबत गौरव करण्यात आला.
डॉक्टरांवरील ताण कमी व्हावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी पुणे शाखेतर्फे कला मंडळ सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.