चपराशी मोठा नेता होतो, कालचा बॉस लहान होतो आणि त्याच्या हाताखाली काम करणारा मोठा होतो. ही आपल्या लोकशाहीची मोठी ताकद आहे. पण म्हणून मी कधी सत्तेची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. आयुष्यात पदे येतात आणि जातात; पण जिवाला जीव देणारी माणसे ही शेवटपर्यंत जवळ असतात, असे मनोगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
निमित्त होते डीएसके फाउंडेशन आयोजित डीएसके गप्पांचे. सुशीलकुमार शिंदे यांच्याशी मुलाखतकार व निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. या वेळी डी. एस कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूरमधील ढोर गल्लीमध्ये माझे बालपण गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र व सख्ख्या आईची जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळे महिना १० रूपये पगारावर मुलांना सांभाळण्याची नोकरी केली. लेडीज क्लबमध्ये काम करत असतानाच वयाच्या १६ व्या वर्षी ७० रुपये पगाराची कोर्टातील पट्टेवाल्याची नोकरी मिळाली. शैक्षणिक कारकिर्दति एसएससीला तीन वेळा नापास झालो, तरी जिद्द सोडली नाही. नाटकाची हौस म्हणून संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे पोलिस दलात नोकरी केली, मुंबईत वकिली केली. हे करत असतानाच राजकारणात येऊन १९७४ मध्ये पहिल्यांदा मंत्री झालो, अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांचा प्रवास कथन केला.
शरद पवार यांनी मला राजकारणात आणले, तर वसंतराव नाईक यांनी मला मंत्रीपद दिले. शरद पवारांमुळे मी यशवंतराव चव्हाण यांच्या जवळ जाऊ शकलो. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली, असे शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना कुठले महत्त्वाचे निर्णय घेतले, असे विचारले असता ते म्हणाले की, तेव्हाही दुष्काळ होता. म्हणून प्राण्यांसाठी चारा छावणी चालू केली, विद्यार्थ्यांसाठी करीअर गायडन्स क्लासेस व विद्यार्थ्यांची विमा योजना सुरू केली.
सोलापूरकरांनी मला सलग आठ वेळा निवडून दिले. एकदा पाडले म्हणून मी त्यांच्यावर नाराज नाही. मला वाईट वाटले नाही. प्रणिती खुल्या जागेवर निवडून येते. ती विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत असते. त्या लोकांनी तिला प्रोत्साहन दिले आणि तिला तिकिट मिळाले. तसेच सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, मद्यार्क कारखाना हे कधीच सुरू करायचे नाही अशी माझी ठाम भूमिका होती, असेही ते म्हणाले. आंतरजातीय लग्न शौक म्हणून करू नये. उच्च व कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न केल्यावर तिचा पण त्याग असतो. दोघांनीही तडजोड करायला हवी. दोन-चार वर्षांत लग्न मोडू नये. मी माझ्या मुलींना आंतरजातीय लग्न करायची मुभा दिली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
या वेळी कवी व लेखक रामदास फुटाणे, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के, विश्वस्त विवेक वेलणकर हेही उपस्थित होते.