प्रख्यात कवी, गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. ललित लेखन, पटकथा- संवाद लेखन अशा अनेक प्रांतात मुशाफिरी केलेल्या मोघे यांच्या कलंदर व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला धांडोळा..
सुधीर आणि त्याचे मित्र यांच्या वयांतलं अंतर पाहता, खरं तर सुधीर आत्ता पन्नाशीतच असायला हवा. मनानं तो होताच पण शरीरानं शेवटी त्याचं वय दाखवलं आणि एका कवीला या जगाचा निरोप घ्यावा लागला. आयुष्यात काहीच ठरवून आणि आखून करायचं नाही, असं ठरवूनच जन्माला आलेल्या सुधीरला शेवटपर्यंत तसं जगता आलं, याचं कारण जे काही केलं, त्यात त्यानं जीव ओतला. मग ती कविता, चित्रपट गीत, चित्रपट, माहितीपट असो की चित्रकला. सुधीर प्रत्येक गोष्टीत फार रमला. रमला आहे, असं वाटेपर्यंत त्यातून मोकळाही झाला. याचं कारण एकच एक गोष्ट करत राहण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. चित्रपटांचा गीतकार म्हणून शिखरावर असताना, अचानक त्याला रामराम ठोकण्याएवढा कलंदरपणा त्याच्यामध्ये होता आणि जे मिळवायचं आहे, त्याच्या मागे लागून श्रमण्यात त्याला रस नव्हता. आयुष्य कसं तब्येतीत जगता यायला हवं, असं त्याला वाटायचं आणि तो तसंच जगायचादेखील.
किलरेस्करवाडीहून पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावरच्या भोंडे कॉलनीत सुधीर राहायला आला आणि बघता बघता त्याचा मित्रपरिवार मोठा होत गेला. डेक्कनवरच्या त्या वेळच्या डिलाइट नावाच्या हॉटेलवजा अड्डय़ावर सुधीर संध्याकाळी हमखास असायचा. बरोबर छायाचित्रकार शिंदे (ज्यांना सगळे सरकार म्हणत), प्रदीप दीक्षित, देबू देवधर, अजित सोमण असं कोणी तरी येत-जात असत. गप्पा कवितांच्याच नसत, कशाच्याही असत. ही गोष्ट ऐंशीच्या दशकातली. तेव्हा सुधीर स्वरानंदच्या ‘आपली आवड’ या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचा. चित्रपटातल्या त्या गीतांमधलं काव्य अलगदपणे उलगडून सांगायचा आणि त्याबरोबर आपल्याही कविता मधूनमधून पेरायचा. त्याच्या कवितांना पुणेकरांनी दिलेली ती पहिली दाद होती. ‘दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन येतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम होतं’ किंवा ‘न्हाऊनिया उभी मी, सुकवीत केस ओले, वेडय़ा मुशाफिराने त्याचेच गीत केले’ या त्याच्या कविता तेव्हाच्या सगळ्या कॉलेज तरुणांना खूप उपयोगाच्या वाटत. तसं सभासमारंभात सुधीरच्या अनेक कविता अनेक जण पाठ म्हणायचे. सुधीरला मात्र त्याचं तेवढं अप्रूप नसे. मोठा भाऊ श्रीकांत मोघे हा तेव्हा चित्रपटाच्या दुनियेत चमकता तारा होता आणि त्याच्या पाठीपाठी राहून काही करायची गरजही त्याला कधी वाटत नसे. सुधीर फडके हे जसं त्याचं दैवत होतं, तसंच गदिमा हेही त्याच्या देव्हाऱ्यात ठळकपणे असत. या दोघांना भेटून आल्यानंतरच्या त्याच्या चेहऱ्यावरच्या सुखद कळा ज्यांनी पाहिल्या, त्यांना आनंद अवर्णनीय असतो म्हणजे काय हे कळलं. मुंबईच्या वाऱ्या वाढल्या तसा सुधीर डिलाइटवरून गायब होऊ लागला. पण पुण्यात असताना तिथं आला नाही, असं कधीच झालं नाही. आठवतंय ते असं की, एका संध्याकाळी बाळासाहेब मंगेशकरांनी दिलेली चाल आणि त्यावर आपल्याला सुचलेले शब्द याचं इतकं अनोखं वर्णन त्यानं केलं, जणू आपणच तिथं हजर होतो, असं वाटावं. आधी नुसती चाल म्हणून दाखवली. तेव्हा काही तरी वेगळं आहे, एवढंच जाणवलं. पण त्यावर केलेलं ‘गोमू संगतीनं, माझ्या तू येशील का’ हे गीत ऐकल्यावर सगळ्यांच्याच नजरा तरारल्या. या गाण्याचं काय होईल, यापेक्षा आपल्याला हे सगळं कसं जमलं, याचं सौख्य अधिक होतं.
मग सुधीर निम्मा मुंबईकर झाला. काही वेळा रात्री उशिरापर्यंत बाबूजींच्या घरी गप्पा मारत राहून तिथंच झोपून सक्काळी डिलाइटवर हजर होणारा सुधीर तेव्हा जानामाना झाला होता. चालीवर गीत बांधायचं म्हणून शब्दांची तोडमोड करण्यापेक्षा त्या शब्दांना मनवण्याचं कौशल्य त्याच्यापाशी होतं. ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ हे त्याचं गीत जेव्हा सगळ्या मराठी लोकांच्या ओठांवर रेंगाळायला लागलं, तेव्हा गीतकार म्हणून सुधीरला लौकिक अर्थानं मान्यता मिळालेली होती. पण म्हणून चित्रपटाच्या त्या रंगेल दुनियेत हरखून जाण्यासारखं त्याला काही जाणवलं नाही. आपण आपल्या कवितेबरोबर असावं, यातच त्याला जास्त आनंदी वाटायचं. ती कविता हीच त्याची सखी होती आणि तीच त्याचं सर्वस्वही. आपण कवी आहोत, याचा जसा सार्थ अभिमान ‘पोएट बोरकरां’ना होता, तस्साच आग्रह सुधीरच्या ठायीही होता. त्यामुळे जगण्याच्या आवेगाच्या अलगद क्षणी सुधीरनं चित्रपटातली गीतं लिहायचं थांबवलं. म्हणजे पूर्ण थांबवलंच असंही नाही. पण त्यासाठी आटापिटा करायचा नाही, असं मात्र नक्की ठरवलं. आपली वाट आपण तयार करायची आणि त्यावर स्वच्छंदपणे फिरत राहायचं, याचं जे अप्रूप त्याला होतं, ते त्याच्या फकिरी स्वभावाला धरूनच होतं. त्यामुळे स्वातंत्र्याचे पोवाडे आपल्या शैलीत रचण्यासाठी ‘स्वतंत्रते भगवती’ हे गीतकाव्य असो की साहिर लुधियानवीच्या ‘परछाईयाँ’ या दीर्घकाव्याचं ‘पडछाया’ हे शब्दांतरण असो. सुधीर मोघे आपली सगळी प्रतिभा अशी कसून उपयोगात आणत होता.
कीर्तनपरंपरेच्या मुशीत वाढल्याने असेल कदाचित पण सुधीर आपल्या कविता कधी लिहून ठेवायचा नाही. सगळं तोंडपाठ. कवितांचा संग्रह काढायचं म्हटलं, तरी करू कधी तरी असं उत्तर. ‘शब्दधून’ हे पुस्तक आलं आणि सुधीरच्या कविता सगळ्यांच्या आयत्या हातात आल्या. सुधीरच्या डोक्यात मात्र वेगळंच काही चाललेलं. आपल्या कवितांना दृश्य स्वरूपात आणण्याचा एक नवा प्रयोग करता येतो का, याचा मनाशीच अभ्यास सुरू होता तेव्हा. एकटय़ानं सगळा रंगमंच तोलून धरायचा आणि तोही केवळ शब्दांच्या सामर्थ्यांवर, हे नाही म्हटलं तरी आव्हानात्मक. पण सुधीरनं ‘कविता पानोपानी’ हा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. कवितांचा हा रंगमंचीय आविष्कार अनोखा होता. तोपर्यंत त्याच्या अनेक कविता मुखोद्गत झालेल्या वाचकांना आता प्रेक्षक म्हणूनही त्या आवडायला लागल्या. हा प्रयोग चालला म्हणून मग रोज त्याचे प्रयोग लावण्याएवढय़ा व्यावसायिकतेचा त्याच्यामध्ये अभावच होता. त्यामुळे काही काळानं ते थांबलं. परत शांतता. कवितेच्या प्रेमात आकंठ बुडून लौकिकाशी सामना करण्याची मनोमन तयारी करण्यासाठी आपल्या ‘मठी’त गढून जाणं. काही दिवसांनी पुन्हा नव्या कार्यक्रमाची जुळवाजुळव.
सुधीरच्या व्यक्तिमत्त्वात शब्द आणि स्वर यांचं अतूट असं अजब रसायन होतं. त्याच्या कवितांनाही त्याच्या मनातली एक चाल असते. ती त्या शब्दांना घेऊन तरंगतच येते. सुधीरला कविता सुचतानाच तिला असलेलं स्वरांचं अस्तर अचूक जाणवायचं. त्यामुळे संगीतकार म्हणून त्याच्यापाशी असलेल्या गुणांचा वापर त्यानं क्वचित केला, तरी तो अतिशय वेधक आणि ठाशीव होता. (रंगुनि रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या कवितेला सुधीरनं दिलेली चाल किंवा दूरचित्रवाणीवरच्या ‘हसरतें’ नावाच्या मालिकेचं हिंदी शीर्षक गीत तेव्हा खूप लोकप्रिय झालं होतं. शब्दांना स्वरांची अशी संगत लाभणं, हा सुधीरच्या कुंडलीतला सर्वात भाग्याचा ग्रह. जगण्याच्या सर्व शक्यता तपासता तपासता आपली चौकस बुद्धी कशी आणि कुठे कामी येईल, हे सांगता येत नाही. सुधीरनं व्यावसायिक स्तरावर माहितीपट तयार करायला सुरुवात केली. अनेक कंपन्यांसाठी त्यानं असे माहितीपट तयार केले. त्या व्यावसायिकतेलाही त्याच्या कविमनाच्या सर्जनाचा स्पर्श असे. आपल्या मूळ गावाच्या – किलरेस्करवाडीच्या – आठवणींनी कधीही व्याकूळ होणाऱ्या सुधीरला जेव्हा किलरेस्कर उद्योगसमूहासाठीच असा माहितीपट करायची संधी मिळाली, तेव्हा त्यानं त्याचं सोनं करणं, हे अगदी सहज होतं. पण हे सगळं किती काळ करायचं याचं कोणतंच गणित त्यानं कधी मांडलं नाही. कारण अचानक त्याला आपल्यातील शब्द-स्वरांच्या पलीकडे असलेल्या रंग-रेषांच्या दुनियेनं खुणावलं. सर्जनानं हरपून जाणं, हाच त्याचा स्वभाव असल्यानं सुधीर तासन्तास त्या रंग-रेषांत बुडून जायचा. आपण चित्रकार आहोत, हे कळणं, हेच खरं त्याच्यासाठीचं सर्वात मोठं ‘प्राईज’ होतं. त्याच्या चित्रांचं प्रदर्शन होईपर्यंत तो असलं काही करत असेल, याची जाणीवही असण्याचं कारण नव्हतं. त्यानं यासंबंधीच्या मनोगतात लिहिलं होतं की, ‘चार-एक वर्षांपूर्वी अगदी अकल्पितपणे ही रंगवाट आपसूक माझ्यासमोर उलगडू लागली. हे घडणं मानसिक पातळीवर इतकं अनिवार्य होतं की, संकोच, न्यूनगंड, दडपण या कशालाही न जुमानता मला ते स्वीकारावंच लागलं. मन:पूर्वकता आणि गांभीर्य ही दोन तत्त्वं मला जगण्यात आणि कलाविष्कारातही केवळ अपरिहार्य वाटतात. त्यांच्याविना अस्तित्वाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळे त्यांची ग्वाही घेत मी ही नवलाईची रूपवाट चालू लागलो, आज चालतो आहे आणि पुढेही चालतंच राहाणार आहे असं दिसतंय.’ मनस्वीपणाचा हा एक नमुनाच.  
कविता हाच ध्यास आणि कविता हाच श्वास हे सुधीरच्या जगण्याचं श्रेयस होतं. त्याचं असणं हे त्याच्या कवितांइतकंच तरल होतं. सगळं काही करून पुन्हा आपण नामानिराळे राहू शकण्याचं भाग्य सुधीरला लाभलं. त्याचं जाणं म्हणूनच असं अगदी जिव्हारी लागणारं.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?