उत्तरायणात कणाकणाने दिनमान वाढेल. सूर्याकडून जास्त ऊर्जा (इन्सोलेशन) मिळत जाईल. या ऊर्जेचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी ही ऊर्जा अन्न साखळीत कशी प्रवेश करेल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. झाडे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पानातील क्लोरोफिल, जमिनीतील पोषक पाणी वापरून स्वतसाठी अन्न बनवतात. अतिशय कौशल्याने हा तिहेरी गोफ गुंफून झाडे स्टार्च, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, आम्ले आणि इतर अनेक रसायनांची निर्मिती करतात. हे सगळे विस्मयकारक व आपल्यासाठी उपकारक आहे. या निर्मितीमध्येच ऊर्जा चक्र जपले जाते. शिषिरात म्हातारी पानं गळतात व वसंतात नवपालवीचे धुमारे येतात. पानांमध्ये म्हातारी पानं व कोवळी पानं कमी सूर्यऊर्जा वापरतात. तर, तरुण पाने जोमाने सूर्यऊर्जा वापरतात. त्यामुळेच ग्रीष्मापर्यंत ही पाने सज्ज होतात ती सौरऊर्जेचे व्यवस्थापन करायला आणि आपल्याला थंड, शीतल सावली द्यायला.

शहरीकरणामध्ये काँक्रिटीकरण आणि काचेची तावदाने वाढली आहेत. त्यामुळे उष्माही वाढतो आहे. म्हणूनच सोसायटय़ा, गृहसंकुले यामध्ये हिरवाई वाढवून सूर्यऊर्जा साठवणे गरजेचे आहे. झाडांमार्फत सौरऊर्जेची साठवण करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यामध्ये अग्रणी नाव प्रा. एस. ए. दाभोळकर यांचे. शेतकरी लोकांचे जीवन स्वावलंबी व्हावे म्हणून ‘प्रयोग’ परिवारातर्फे अनेक प्रयोग केले गेले व याचे लघुरूप शहरी शेतीच्या प्रयोगातून प्रतीत होत राहिले. आज शहरात या प्रयोगांची व ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. गणितज्ञ असलेल्या प्रा. दाभोळकरांनी एक चौरस फुटांमध्ये दिवसभरात पाने किती सूर्यऊर्जा खातील याचे गणित मांडले व शेतकऱ्यांना ‘लिफ इंडेक्स’ समजावला. प्रत्येक झाडाचा लिफ इंडेक्स वेगळा असतो; जो पाच ते दहामध्ये असतो. जर एखाद्या झाडाचा लिफ इंडेक्स पाच असेल तर त्याला जास्तीतजास्त सूर्यऊर्जा साठविण्यासाठी पाच चौरस फूट पानांची छत्री (कॅनोपी) हवी. उपलब्ध जागेत पानांची संख्या किती असावी याचे गणित समजले तर भरपूर उत्पादन परसबागेत मिळू शकते.

माझ्या घराच्या गच्चीवर दुधीभोपळ्याचा वेल लावला. तो चढण्यासाठी स्टँड केला. वेलाचे खोड स्टँडचा आधार घेत झपाटय़ाने वर चढले. स्टँडवर चढताना जास्तीत जास्त पाने पूर्वाभिमुखी आलेली पाहून आम्ही अचंबित झालो. सूर्यऊर्जा साठविण्यात झाडे तरबेज असतात हे लक्षात आले. लवकरच वेलाने मांडवावर हातपाय पसरले. पानांचा आकार झपाटय़ाने वाढला. दहा ते बारा इंच मोठय़ा पानांनी सूर्याची संजीवक ऊर्जा साठवली अन् एका दुधीभोपळ्याच्या वेलाला दोन-दोन किलोचे ५० भोपळे आले. वर हिरव्या कंच पानांचा मांडव त्या मांडवाखाली आलेली पालकाची भाजी अन् वेलांना लटकणारे दुधीभोपळे म्हणजे सूर्यकिरणांची सुगी होती. सूर्यऊर्जा खाऊन झाडे किती खूश होतात याचे इथे प्रत्यंतर आले.

हीच गोष्ट पपईच्या झाडाने सिद्ध केली. पपईच्या झाडाचा विस्तार २५ चौरस फूट झाला आहे. त्यात ३० पाने आहेत. प्रत्येक पान दीड फूट बाय दीड फूट आहे व आज त्यास दोन किलोच्या १२ पपया लागल्या आहेत. छोटय़ा-छोटय़ा १५-२० पपया आहेत, ज्या येणाऱ्या कालावधीत वाढतील. पण सध्यातरी निदान २४ किलो अन्ननिर्मिती माझ्या पपईने माझ्यासाठी केली आहे. तीसुद्धा कोणतीही खते न वापरता निव्वळ पालापाचोळ्याची माती, माफक पाणी व भरपूर सूर्यऊर्जा वापरून. पुढील काळात तुम्ही गच्चीत छोटय़ा दुरडय़ांमध्ये सेंद्रिय माती भरून पालक, मेथी, शेपू, कोिथबीर, चुका, राजगिरा, माठ अशा पालेभाज्यांचं बी पेरून झटपट अन्ननिर्मिती करू शकाल.    दाभोळकर यांनी आणखी एक संकल्पना मांडली आहे ती रुर्बनायझेशन (रुरल अबर्नायझेशन – ग्रामीण भागातील निसर्ग आणि नागरी जीवनामधील अ‍ॅमेनिटिज् यांचे एकत्रीकरण). आज शेत जमिनींमध्ये उभ्या राहणाऱ्या टाऊनशिपमध्ये शहरी शेती करणे काळाची गरज आहे. पाणी पिणारी हिरवळ व परिसंस्थेत न मावणारा खोटा निसर्ग फुलविण्यापेक्षा शाश्वत निसर्ग परिसंस्था जपणे, फुलवणे हे आपले काम आहे. परसबागेत आपण झाडं लावत आहोत. पण झाडांना नक्की काय हवंय यासाठी निसर्गातील विज्ञान समजून घ्या. विज्ञानाधिष्टित दृष्टिकोन जपला तर आपल्याकडे ‘विपुला’च सृष्टी आहे.

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

(संदर्भ : प्लेंटी फॉर ऑल, प्रा. एस. ए. दाभोळकर)