पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेसेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तीन पदरीकरणासाठी रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असली तरी या प्रकल्पाला दिरंगाई झाल्याने त्याच्या अंदाजित खर्चात दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे-नाशिकच्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही निधी जाहीर झाला, मात्र या प्रकल्पासाठी भविष्यात जागा मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार असल्याचेही दिसते आहे.
पुणे-मुंबई दरम्यान गाडय़ांची संख्या वाढवावी व पुणे-लोणावळा लोकल सेवेचा विस्तार करण्याची पुणेकरांनी अनेक वर्षांची मागणी होती. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या गाडय़ा लक्षात घेता एकही नवी गाडी वाढविणे शक्य नव्हते. गाडय़ांची संख्या वाढविण्यासाठी पुणे- लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गाचे तीनपदरीकरण करणे, हा एकमेव पर्याय होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाचा रेल्वे अर्थसंकल्पात समावेश करून व निधी जाहीर केल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे-लोणावळा मार्गाच्या तीनपदरीकरणासाठी यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी या ६४ किलोमीटरच्या मार्गासाठी सुमारे ४०० कोटी रुपये अंदाजित खर्च होता. सर्वेक्षण झाले, पण मागील सरकारच्या काळात हा विषय पुढे जाऊ शकला नाही. कामासाठी कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे काही काळ हा प्रकल्प मागे पडला होता. सुरेश प्रभूंनी या प्रकल्पाला संजीवनी दिली असली, तरी दिरंगाई झाल्याने या प्रकल्पासाठी आता अंदाजित खर्च ८०० कोटींवर पोहोचला आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात त्यातील १८ कोटी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे-नाशिक नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करून हाही महत्त्वाचा विषय प्रभू यांनी मार्गी लावला आहे. या मार्गाचा दोन्ही शहरांना व हा मार्ग जाणाऱ्या भागातील प्रवासी, शेतकरी व व्यापारी यांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे. सध्या रेल्वेने नाशिकला जाण्यासाठी कर्जत, पनवेल, कल्याण मार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. त्यातून सध्याच्या रेल्वेसेवेला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. नवा लोहमार्ग राजगुरुनगर, आळेफाटा, नारायणगाव, संगमनेर असा असणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक हे अंतर २६० किलोमीटरचे होणार आहे. पुणे-लोणावळा तीनपदरीकरणासाठी लागणारी बहुतांश जागा रेल्वेची आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जागेची फारशी अडचण नाही. मात्र, पुणे-नाशिक मार्गासाठी नव्याने जागा मिळवावी लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसते आहे.