स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पुण्यात पक्षाच्या चौकशी समितीसमोर हजेरी लावली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सदाभाऊ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आजच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे आता पुढील निर्णय नेतृत्त्वाला घ्यायचा आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. पक्ष नेतृत्त्वाशी चर्चा करण्यासंदर्भात माझा कोणताही आक्षेप नाही. त्यांच्याजवळील काही लोकांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, मी राजू शेट्टींवर नाराज नाही. कोणत्याही चर्चेसाठी मी केव्हाही तयार आहे. गरज पडल्यास पक्षनेतृत्तावाशी चर्चा करण्यासाठीही तयार असल्याचे मी चौकशी समितीला कळवले आहे. मात्र, यापुढे कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार नाही, असे सदाभाऊंनी स्पष्ट केले. दरम्यान, पक्षाने माझ्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर मी पुढील भूमिका स्पष्ट करेन. तसेच ऑगस्ट महिन्यात आपण राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत सदाभाऊ राजू शेट्टी यांचा उल्लेख पक्षनेतृत्त्व असा केला. त्यामुळे सदाभाऊ यांचा स्वाभिमानीतून बाहेर पडण्याचा निर्णय निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पुण्यात चौकशी समितीपुढे हजर होण्यापूर्वी सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम’, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेने आणखी जोर धरला होता. मात्र, तुर्तास तरी त्यांनी हा निर्णय पक्षनेतृत्त्वावर सोपवून वाट पाहण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसते.

दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या चौकशी समितीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीच्या सदस्यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर चांगल्याप्रकारे चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळी सदाभाऊ यांनी प्रथम तुम्ही निर्णय घ्या, मग मी स्वत:ची भूमिका जाहीर करेन, असा पवित्रा घेतल्याचे सांगितले. आम्हाला ही भूमिका पटलेली नाही. त्यामुळे आम्ही येत्या चार दिवसांत याबाबतचा अहवाल तयार करून पक्षनेतृत्त्वाकडे पाठवू, असे समितीकडून सांगण्यात आले.