स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकात बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (२७ मे) सकाळी सात वाजता होणार आहे. स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरणार आहे.

पुलाच्या उद्घाटनासंबंधीची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल बांधण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने एप्रिल २०१३ मध्ये मान्यता दिली होती. या पुलाचे प्रत्यक्ष काम १० जून २०१३ रोजी सुरू झाले. या उड्डाणपुलाचा एक भाग स्वारगेट एसटी स्थानकाकडून सातारा रस्त्याकडे जाणारा आहे. या एका भागाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून तो भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

सातारा रस्त्यावरून येणाऱ्या व नेहरू स्टेडियमकडे तसेच सोलापूर रस्त्याकडे उतरणाऱ्या दोन भागांचे काम बाकी होते. तेही आता पूर्ण झाले आहे. सुरुवातीला ९९ कोटी रुपये खर्चाचा अंदाज असलेल्या या पुलाच्या कामाला १५७ कोटी रुपये खर्च आला आहे. मध्यंतरी काही महिने या पुलाचे काम रेंगाळले होते, मात्र आता ते पूर्ण झाले असून हा पूल उद्घाटनानंतर लगेच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.

या पुलामुळे आता स्वारगेटच्या चौकात नेहमी होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. सातारा रस्त्याने येणारी आणि शंकरशेठ रस्ता तसेच सारसबागेकडे थेट जाणारी सर्व वाहने आता स्वारगेट चौकात न येता या पुलावरून जातील. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी आयोजित करा, अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजता उद्घाटन केले जाणार आहे.