देखभाल नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे शोभेपुरतेच

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून चित्रीकरण होत असले तरी ते शोभेपुरतेच होत आहे. तेथील कॅमेऱ्यांची एसटी महामंडळाकडून देखभाल न झाल्यामुळे स्थानकाच्या आवारातील पाच कॅमेरे तांत्रिकदृष्टय़ा सुरू असले तरी कॅमेऱ्यांद्वारे टिपली जाणारे चित्रीकरण धूसर आहे. एसटी स्थानकाच्या आवारात राज्य शासनाकडून बसविण्यात आलेले चार कॅमेरे सुस्थितीत आहेत. एकंदरच स्वारगेट स्थानकाच्या आवारातील वर्दळ, तेथे होणाऱ्या चोरीमारीच्या घटना पाहता आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणाचा पोलिसांच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नसल्याचे उघड झाले आहे.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. तेथील सुरक्षिततेसाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी दिलेल्या निधीतून स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात १२४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी चार कॅमेरे स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात बसविण्यात आले आहेत. एसटी स्थानकाच्या आवारात भुरटय़ा चोरांचा वावर असतो. त्यामुळे प्रवाशांच्या बॅगांमधील महागडा ऐवज चोरीला जाणे, मोबाइल, लॅपटॉप चोरणे अशा घटना तेथे कायम घडतात.

आठवडय़ापूर्वी स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एसटीच्या वाहकासारखा वेश परिधान करून एकाने प्रवाशांना बनावट तिकिटांची विक्री करून प्रवाशांकडून पैसे उकळले होते. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रवाशांकडे बतावणी करून त्यांच्याकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटना आवारात घडल्या आहेत. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून तपासासाठी एसटी स्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात येते. ज्या भागात आमदार निधीतून कॅमेरे बसविण्यात आले आहेत तेथील चित्रीकरण धूसर असल्याने चोरटय़ाचा माग काढणे अवघड होते. या कॅमेऱ्यांची देखभाल करावी किंवा तेथे तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असलेले कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी विनंती पोलिसांकडून स्वारगेट पोलिसांकडून एसटी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मुंबई-बोरिवली दरम्यान धावणाऱ्या शिवनेरी बसच्या फलाटालगत चोरटय़ांचा वावर असतो. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगेतील लॅपटॉप, मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना तेथे कायम घडतात. शिवनेरी बससेवेच्या फलाटालगत कॅमेरे बसविल्यास चोरटय़ांचे वर्णन उपलब्ध होईल. तेथील चोऱ्यांना काही प्रमाणात आळा बसेल. उन्हाळी सुट्टीत स्थानकाच्या आवारात चोरीच्या घटना वाढतात, असे निरीक्षण पोलीस अधिकाऱ्याने नोंदविले.

चांगल्या दर्जाचे कॅमेरे आवश्यक

राज्यातील गजबजलेली रेल्वे स्थानके, एसटी स्थानके संवदेनशील आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात चांगल्या दर्जाचे आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. एसटी स्थानकाच्या आवारात बेवारस बॅग सापडण्याच्या घटना घडतात. एसटी प्रशासनाला पोलिसांकडून वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. वीस वर्षांपूर्वी स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका एसटी बसमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. राज्य शासनाकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत, तसेच स्वारगेट पोलीस ठाण्यातदेखील हे चित्रीकरण पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.