विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा

राज्यात स्वाईन फ्लूने जवळपास ८० टक्के मृत्यू केवळ पुणे, अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद या चार जिल्ह्य़ांत झाल्याचे समोर आले आहे. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात असलेला फरक कमी झाल्यामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आरोग्य विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूचे ८१५ रुग्ण आढळले असून १५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी केवळ पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड या भागात स्वाईन फ्लूच्या ४६ मृत्यूंची नोंद झाली असून अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद येथील मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘‘विषम तापमान विषाणूंसाठी पोषक ठरते. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी झाल्यामुळे आता हळूहळू विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी स्वाईन फ्लूचा प्रसार कमी होता, त्यामुळे या वर्षी सरकारी व खासगी डॉक्टरांचीही स्वाईन फ्लूसाठी उजळणी करून घेणे आवश्यक आहे. गेल्या आठवडय़ात पुण्यासह इतरही जिल्ह्य़ांमध्ये एकूण १५ कार्यशाळा घेण्यात आल्या असून डॉक्टरांना रुग्णोपचारांबद्दल माहिती देण्यात आली.’’

पालिकांनीही लस खरेदी करावी

स्वाईन फ्लूची नवी प्रतिबंधक लस मे महिन्यात मिळणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने मागणी नोंदवली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्याच्या स्वाईन फ्लू लसीकरण मोहिमेस मिळालेला प्रतिसाद मात्र तोकडा आहे. मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारांचे रुग्ण व गरोदर स्त्रिया या अतिजोखमीच्या कटातील केवळ २६,६०० व्यक्तींनी स्वाईन फ्लूची लस घेतली आहे.

डॉ. आवटे म्हणाले, ‘‘राज्य शासनातर्फे स्वाईन फ्लू लस पुरवली जाईल; परंतु पालिकांनीही लस खरेदी करून नागरिकांना द्यावी असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अतिजोखमीच्या अधिक व्यक्तींना लस मिळू शकेल. नाशिक, नगर व औरंगाबाद येथे झालेल्या कार्यशाळांमध्ये ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, ‘इंडियन असोसिएशन ऑफ पिडिआट्रिक्स’ आणि ‘फॉग्सी’ या डॉक्टरांच्या संघटनांना संस्थात्मक स्वरूपात लस खरेदी करून सवलतीच्या दरात लसीकरण सुरू करण्याबाबत सुचवले आहे.’’