पुणे शहराचा विकास आराखडा राज्य शासनाने ताब्यात घेतला आहे. विकास आराखडय़ातील आरक्षणांबाबत घोटाळा झाला असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी आणि आराखडय़ाबाबत केवळ वक्तव्य करत न बसता विकास आराखडय़ाबाबत निर्णय घ्यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना केले.
पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक पवार यांनी शुक्रवारी घेतली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पक्षाच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेता बंडू केमसे यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत   पवार म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार नाही. मात्र राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिका आमच्याकडे आहेत. त्यांच्या कामांचा आढावा मी सध्या घेत आहे. पुण्याच्या विकास आराखडय़ाचा चेंडू आता राज्य शासनाकडे गेला आहे. आराखडय़ातील घोटाळ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत बसू नये. त्यांनी आता निर्णय घ्यावेत.
मेट्रोसाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार
पुणे मेट्रो प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आमचे सरकार असताना रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यात कोणतेही सरकार असले, तरी ते आमचे ऐकतील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. पुणे मेट्रोबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुजाभाव केला का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. नागपूर हे महाराष्ट्रातच आहे.
बिहारची निवडणूक दिशा देईल
मोदी सरकारची लोकप्रियता कमी होत असून अच्छे दिनची नवी व्याख्या आता जाणवू लागली आहे. एका वर्षांत इतक्या वेगाने हे  सरकार प्रगती करेल असे वाटले नव्हते. या पाश्र्वभूमीवर बिहारची निवडणूक होत असून ही निवडणूक देशाला दिशा देईल. बिहारमध्ये दारिद्रय असले, तरी विचारांचे आणि दिशा देण्याचे दारिद्रय नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
.. अशा नगरसेवकांवर कारवाई होईल
बैठकीत शरद पवार यांनी प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागात त्याने आतापर्यंत कोणती विकासकामे केली आहेत याची माहिती द्यायला सांगितले. आपापल्या प्रभागात तुम्ही चांगले काम करत आहात. सर्वानी मिळून आता शहरासाठी एकत्रितपणे काम करा, अशी सूचना पवार यांनी नगरसेवकांना केली. महापालिकेत काही नगरसेवक व अधिकाऱ्यांची मिळून मिलीभगत आहे. काहीजण अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामासंबंधीची कामे करून देतात तर काहीजण बिल्डरना त्रास देतात. अशी कामे करणारे नगरसेवक कोणत्याही पक्षाचे असले अगदी राष्ट्रवादीचेही नगरसेवक अशी कामे करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही पवार यांनी बैठकीत सांगितले.