चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या आवारातील जुनी झाडे रविवारी, सुट्टीच्या दिवशी तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकरण अंगावर शेकण्याची चिन्हे दिसताच पालिकेच्या परवानगीनेच ही तोड झाली असून फक्त निर्धारित संख्येपेक्षा जास्त झाडे तोडली गेल्याची सारवासारव करण्यात येत आहे.

चिंचवडच्या तालेरा रुग्णालयाच्या आवारातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने उद्यान विभागाकडे केली. त्यानुसार, कंत्राटदाराला ते काम देण्यात आले. रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन त्याने बेसुमार झाडे तोडली. फक्त फांद्या छाटण्याचे काम असताना मोठी व जुनी झाडे तोडली. त्यावेळी रुग्णालयाचा कोणीही अधिकारी हजर नव्हता. सोमवारी हा प्रकार लक्षात आला. उद्यान अधीक्षकांनी अहवाल मागावून घेतला आहे. या संदर्भात, कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.