पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने शिक्षण सम्राटांना धक्का दिला आहे. ज्या शाळांनी मिळकत कर भरलेला नाही, अशा शाळांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत भोसरी येथील भैरवनाथ शाळा आणि शाहू नगर येथील अभिषेक विद्यालयाला सील ठोकण्यात आले. प्रशासकीय अधिकारी नाना मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन शाळांनी तब्बल १ कोटी ६७ लाख एवढी रक्कम थकीत ठेवली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कर संकलन विभागाने कर बुडवणाऱ्या शिक्षण संस्थावर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. मार्चमध्ये पिंपरी- चिंचवडमधील विविध ठिकाणी कर संकलन विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा सुरु केलेल्या कारवाईत रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ, भैरवनाथ शाळा, भोसरी, आणि शाहूनगर येथील अभिषेक विद्यालय या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यात आली. सील ठोकलेल्या शाळांची १ कोटी ६७ लाख रुपये इतका मिळकत कर थकल्याचे समोर आले आहे. पाच वर्षांपासून अभिषेक शाळेने ४९ लाख रुपये इतकी थकबाकी ठेवली आहे. तर भोसरी येथील भैरवनाथ शाळेने तब्बल १ कोटी १८ लाख रुपये मिळकत कर अद्याप भरलेला नाही. विशेष म्हणजे ३५ शैक्षणिक संस्थांनी मिळकत कर थकवल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली होती. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली.

प्रशासकीय अधिकारी संदीप खोत, नाना मोरे, तुपे, अमर तेजवाणी आणि सहायक मंडळाधिकारी वैभवी गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]