अखत्यारीत नसलेले काम करण्यासाठी दबाव आणल्याने व ते न केल्यामुळे सुरू झालेल्या अधिकारी वर्गाच्या छळास कंटाळून पुण्याजवळच्या वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्य़ाची नोंद झाली नव्हती.

जीवन वाघमारे (वय ४२) असे या शिक्षकाचे नाव आहे. वाघमारे हे लोहगाव येथे राहत होते. वाघोली येथील जिल्हा परिषदेतील शाळेत ते शिकवीत असत. मात्र त्या भागातीलच पाषाण शाळा बंद करण्याच्या कारवाईत त्यांनी सहकार्य केले नाही, असा ठपका ठेवून शिक्षण विभागाकडून काही महिन्यांपूर्वी वाघमारे यांच्यासह इतर काही शिक्षकांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे वाघमारे निराश झाले होते. त्याच अवस्थेत ते सोमवारी कर्जतकडे येत होते. गाडीतच विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. ते कर्जत येथे जात असताना त्यांच्या नातेवाइकांशी दर तासाला मोबाइलवरून संपर्क करीत होते. त्यांचे नातेवाईक त्यांच्या शोधात निघाले होते पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच त्यांनी विष घेतले. कर्जतमधील काही लोकांनी त्यांची गाडी पाहून पोलिसांना याबाबत माहिती दिली असता त्यांना उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान शिक्षण खात्याचे अधिकारी कर्जतमधील शिक्षकांशी संपर्क साधून तेथे नेमके काय झाले आहे याची विचारणा करीत होते.

वाघमारे यांची गाडी कर्जत पोलिस ठाण्यात असून याबाबत गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून आज, बुधवारी शिक्षक संघटना आंदोलन करण्याची शक्यता आहे. एखादी शाळा बंद करण्यामध्ये दुसऱ्या शाळेतील शिक्षक काही भूमिका कशी काय बजावू शकतील, असा प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे.

‘अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असताना वाघमारे यांनी प्रशासकीय कामासाठी सहकार्य केले नाही म्हणून त्यांना काही महिन्यांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यानंतर विभागाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.’

 – मुश्ताक शेख,  शिक्षण अधिकारी, पुणे</strong>