विनोद तावडे यांच्या हस्ते अ‍ॅपचे उद्घाटन

शिक्षकांना अभ्यासक्रमातील घटकांपासून ते शासनाच्या पत्रकांपर्यंतची माहिती आता ‘मित्र’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार असून त्याचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी झाले. ‘शिक्षकांचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्यात येतील,’ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शिक्षक, अधिकारी यांना सर्व निर्णय, नियोजन, प्रशिक्षणाची वेळापत्रके, पाठय़पुस्तकातील घटक, शिक्षण विभागातील घडामोडी, नव्या योजना यांची एकत्रित माहिती ‘मित्र’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. शिक्षक, अधिकारी गुगल प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत रविवारी या अ‍ॅपचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. तावडे म्हणाले, ‘शिक्षकांचे प्रश्न गांभीर्यपूर्वक सोडविण्यात येतील. त्याचबरोबर शिक्षकांनीही या क्षेत्रात सेवाभावीवृत्तीने काम करायला हवे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी शिक्षणाचा सर्वसमावेशक आराखडा अमलात आणावा. वेगवेगळया राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती सर्वाना व्हावी. त्यासाठी राज्यांना भेटी द्याव्यात शहराच्या विकास आराखडय़ाप्रमाणेच शिक्षणाचा विकास आराखडा हवा.’

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप, शिक्षण सचिव नंदकुमार, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दीव व दमण तसेच दादरा नगर हवेली राज्यांचे शिक्षण सचिव, शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.