अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दौऱ्यावरून ‘जाता-जाता’ मोदी सरकारचे कान टोचले, ते नेमके काय बोलले, याचे आत्मचिंतन करावे, अशी टिप्पणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. बारामतीतील कार्यक्रमासाठी मोदींची हजेरी, यावर कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. विरोधात असताना वारेमाप घोषणा करून सत्तेत आल्यानंतर कार्यवाही न करणारे केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचे अजितदादांनी वाभाडे काढले. आमच्यावर नुसतेच आरोप करण्यापेक्षा चुकीचे केले असल्यास सरकारने कारवाई करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
िपपरी पालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी शहरात आलेल्या अजितदादांनी आकुर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभेवेळी असलेली मोदी लाट विधानसभेच्या वेळी ओसरली होती. दिल्लीच्या निवडणुकीनंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. लाट कधीच कायम राहत नसते. अपेक्षापूर्ती न झाल्यास जनता पाठ फिरवते, असाच इतिहास आहे. धर्म ही भाजपची ओळख आहे तर हिंदूुत्व शिवसेनेचा मुद्दा आहे. ओबामा यांनी जाता-जाता कान टोचले, त्याचे या मंडळींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोदींच्या बारामती दौऱ्यातून राजकीय अर्थ काढू नका. ‘एफआरपी’चे त्रांगडे झाले आहे. त्यानुसार दर देण्याकरिता कमी पडणारी रक्कम केंद्र व राज्य सरकारने द्यावी. टोकाचा निर्णय घेऊन कारखाने बंद पडल्यास हजारो कोटींचे नुकसान होईल आणि राज्यात हाहाकार माजेल.
–चौकट–
मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घ्यावी
आमच्या काळात गृहखाते वेगळे होते, आता ते मुख्यमंत्र्यांकडे आहे. तेथे २४ तास लक्ष द्यावे लागते. मुख्यमंत्र्यानी कडक भूमिका घ्यायला हवी. नागपूर, वर्धा, औरंगाबाद, बारामती येथील घटनांकडे पाहता गुन्हेगारांवर पोलीसांचा जरब नसल्याचे दिसून येते, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.